किराणा दुकानदाराची गळफास घेऊन आत्महत्या; शेगाव तालुक्यातील घटना
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः किराणा दुकानदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज, २८ ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास पहूरपूर्णा (ता. शेगाव) येथे समोर आली.
गजानन वासुदेव थारकर (५०, रा. पहुरपूर्णा, ता. शेगाव) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. थारकर यांचे गावातच किराणा दुकान होते. त्यांचा एक मुलगा इंजिनीअर तर दुसरा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. थारकर यांनी राहत्या घरातील फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. घरातील सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी हंबरडा फोडला. शेगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. थारकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण वृत्त लिहीपर्यंत समोर येऊ शकले नाही. शेगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.