कार-सिमेंट मिक्सर ट्रकचा भीषण अपघात; महिला ठार, एकाच कुटुंबातील लोणारचे ५ जण जखमी, सिंदखेड राजा तालुक्यातील दुर्घटना
मलकापूर पांग्रा (अमोल साळवे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन ६५ वर्षीय वृद्ध महिला जागीच ठार तर एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले आहेत. अपघात होताच ट्रकचालक फरारी झाला. ही घटना राहेरी-किनगाव रोडवरील नायरा पेट्रोलपंपाजवळ (ता. सिंदखेड राजा) आज, ५ सप्टेंबरच्या दुपारी चारच्या सुमारास घडली.
सौ. उज्ज्वला मुकुंदराव देशमुख (६५, गाडगेनगर, अमरावती) असे ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. सौ. आशा अशोक सानप (५४), डॉ. नीलेश अशोक सानप (३८), सौ. आदिती नीलेश सानप (३२), रिशांत नीलेश सानप (८), आवेश नीलेश सानप (१, सर्व रा. खटकेश्वरनगर, लोणार) अशी जखमींची नावे आहेत. सानप परिवार देऊळगाव राजा येथून बालाजी मंदिरात अभिषेक करून लोणारला कारने (क्रमांक एमएच २०, सीएस ०४०३) परतत होता.
नायरा पेट्रोलपंपाजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकशी (क्रमांक एमएच ०४, ईवाय ३३७४) त्यांच्या कारचा अपघात झाला. धडक इतकी जबर होती की कारचे दोन्ही वाहने रस्त्याखाली येऊन क्षतीग्रस्त झाली. घटनेची माहिती मिळताच किनगाव राजा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरिक्षक युवराज रबडे, पो.ना. महादेव साळवे, पो.काँ. सुधाकर गवई, बीट जमादार राजू दराडे, श्री. बनसोडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. अपघातानंतर ट्रकचालकाने वाहन तसेच सोडून पळ काढला. हे वाहन मुंबईच्या यादव नावाच्या व्यक्तीचे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.