अवघड काम करताना तरुण कामगाराचा मृत्‍यू; चिखली MIDC तील कंपनीच्या मॅनेजरविरुद्ध गुन्हा दाखल

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कंपनीच्या मॅनेजरने कामगाराकडून अवघड काम करून घेतले. हे काम करताना २१ वर्षीय कामगार गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृतक तरुणाच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून श्री सतीजी इन्फ्राटेक अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, एमआयडीसी चिखली येथील मॅनेजर अभिषेक बनवारी चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल …
 

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कंपनीच्या मॅनेजरने कामगाराकडून अवघड काम करून घेतले. हे काम करताना २१ वर्षीय कामगार गंभीर जखमी झाला. त्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याप्रकरणी मृतक तरुणाच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यावरून श्री सतीजी इन्फ्राटेक अँड मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, एमआयडीसी चिखली येथील मॅनेजर अभिषेक बनवारी चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राम सिद्धेश्वर शेळके (२१, रा. मलगी ता. चिखली) हा चिखली एमआयडीसी परिसरात असणाऱ्या या कंपनीत काम करत होता. लोखंडी सीटपासून टिनपत्रे तयार करणे तसेच गोडावूनसाठी लागणारे मोठमोठे लोखंडी खांब व अँगल तयार करण्याचे काम या कंपनीत चालते. २० जुलै रोजी दुपारी साडेचारच्या दरम्यान कंपनीत लागलेल्या ट्रकमधून लोखंडी प्लेटा काढण्यासाठी त्या प्लेटांना पट्टे लावण्याचे काम मॅनेजर चौधरी यांनी रामला सांगितले. लोखंडी प्लेटांना बेल्ट लावून त्या काढण्याचे काम करत असताना त्या प्लेटांचा बॅलन्स जाऊन त्याचा जबर मार लागला. त्यात तो गंभीर जखमी झाला. काम करत असताना व मार लागू नये म्हणून कंपनीने कोणतीही सुरक्षा उपकरणे पुरविली नसल्याचे रामने मृत्यूपूर्वी उपचार सुरू असताना सांगितले होते. घटनेची माहिती रामच्या परिवारातील सदस्यांना खूप उशिरा देण्यात आली. रामला उपचारासाठी लवकर दाखल केले नाही. रुग्‍णवाहिकेची आवश्यकता असताना स्‍कूल बसने रुग्णालयात पाठवले. उपचारादरम्यान २१ जुलै रोजी रामचा औरंगाबाद येथे मृत्यू झाला. कंपनी मॅनेजरच्या निष्काळजीपणामुळे माझा कर्ता मुलगा गमावला असल्याची तक्रार रामची आई मंदा सिध्देश्वर शेळके (रा. मलगी, ता. चिखली) यांनी १० जुलै रोजी चिखली पोलीस ठाण्यात दिली.