अतिवृष्टीचे आणखी दोन बळी!; खुपगावमध्ये एकाच दिवशी तिघांवर अंत्यसंस्काराची ग्रामस्थांवर दुर्दैवी वेळ!!
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा तालुक्यातील खुपगाव येथे एकाच दिवशी तीन जणांचा मृत्यू झाल्याने गाव शोकसागरात बुडाले आहे. दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या घेऊन जीवन संपविले तर एका दिव्यांग शेतकऱ्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. काल, १ ऑक्टोबर रोजी या घटना घडल्या आहेत.
सिद्धेश्वर दिनकर जाधव (४८) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली तर संदीप लक्ष्मण नावकार (३५) या शेतकऱ्याने गळफास घेतला. तिसऱ्या घटनेत गावातील दिव्यांग शेतकरी आत्माराम तोताराम नाटेकर (७५) यांचा वृद्धत्वामुळे मृत्यू झाला. सिद्धेश्वर दिनकर जाधव यांनी यांच्याकडील ६ एकर शेतात सोयाबीनची पेरणी केलेली होती. मात्र अतिवृष्टीने जाधव यांच्या शेतातील पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे २९ सप्टेंबर रोजी त्यांनी विष घेतले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना काल, १ ऑक्टोबरच्या पहाटे चारला त्यांचा मृत्यू झाला. सिद्धेश्वर जाधव यांच्या निधनाची वार्ता कळल्याने त्यांच्या अंत्यविधीसाठी बुलडाण्यात लहान्या मुलाकडे राहणारे लक्ष्मण नावकार खूपगाव येथे आले होते. तेव्हा त्यांच्या खुपगाव येथे शेती सांभाळणाऱ्या संदीप लक्ष्मण नावकर (३६) या मुलाने राहत्या घरात गळफास घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी एकच टाहो फोडला.
घटनेची माहिती मिळताच बुलडाणा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. संदीपच्या वडिलांचे नावावर असलेले दीड एकर शेत पैनगंगेच्या काठावर आहे. २७, २८ सप्टेंबर रोजी आलेल्या महापुराने पूर्ण शेत खरडून गेले. वडिलांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे १ लाख ५५ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. ते आता कसे फेडायचे अशी चिंता संदीपला सतावत होती. या नैराश्यातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, १ मुलगा, दिव्यांग भाऊ आणि वडील असा परिवार आहे. सिद्धेश्वर आणि संदीप यांची चिता विझत नाही तोच गावातील दिव्यांग शेतकरी आत्माराम तोताराम नाटेकर (७५) यांचाही मृत्यू झाला.एकाच दिवशी तिघांवर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ यामुळे खुपगाववासीयांवर आली.