कुंबेफळमधील तरुणाची आत्महत्या; आईला फोनवर सांगितले अखेरचे शब्द....

 
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कुंबेफळ येथील नीलेश प्रकाश चव्हाण (वय ३०) या तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ९ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने स्वतःच्या आईला फोन करून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले . त्यामुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

नीलेश चव्हाण याने बीबी शिवारातील उंबर मळा परिसरातील शेतात, नाल्याच्या काठावरील झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, गळफास घेण्याआधी त्याने आईला थेट फोन करून आपण आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. ही धक्कादायक बातमी समजताच घरातील सदस्य आणि नातेवाइकांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. काही वेळातच तो झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

तातडीने त्याला बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या घटनेबाबत रोशन रमेश चव्हाण यांच्या तोंडी तक्रारीवरून बीबी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, नीलेशने आत्महत्यासारखा टोकाचा निर्णय का घेतला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.