ईसोलीचे येवले दाम्पत्य आजपासून करणार मोबाईलचा उपवास! नूतन वर्षाचा संकल्प; आठवड्यातून एक दिवस मोबाईल ठेवणार बंद ..
मोबाईलच्या वाढत्या वापराने समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेकांचे संसार मोबाईलमुळे धोक्यात आल्याचे उदाहरणे आहेत. लहान मुले मोबाईलच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर परिणाम होत असल्याचे डॉक्टर सांगतात. मुलांमध्ये कमी वयात चिडचिडेपणा, मानसिक ताण, एकलकोंडेपणा अशा समस्या वाढल्या आहेत. याला मोबाईल जबाबदार आहे. विद्यार्थी शाळेत लक्ष देण्याऐवजी मोबाईलच्या स्क्रिनवर वेळ घालवतात. अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने स्पर्धेत मागे पडत आहेत. लेकरांच्या वाढत्या मोबाईलवेडाने आई-वडील त्रस्त झाले असून जवळपास प्रत्येक घरात हीच समस्या आहे. तज्ञ मंडळी मोबाईलचा वापर कमी करण्याबाबत सल्ला देतात. याकडे वेळीच लक्ष दिल्यास बरे नाहीतर भविष्यात गंभीर परिणाम समोर येतील एवढे नक्की.
चांगल्याची सुरुवात स्वतःपासून
चिखली तालुक्यातील ईसोली येथील गोविंद येवले हे राजर्षी शाहू मल्टिस्टेटमध्ये विभागीय व्यवस्थापक आहेत. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीपदादा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करण्याचा त्यांचा मानस असतो. नवीन वर्षानिमित्त मोबाईलचा उपवास करण्याचा संकल्प ही प्रेरणा सुद्धा संदीपदादांकडून घेतल्याचे येवले सांगतात. या संकल्पामध्ये त्यांच्यासोबत पत्नी शिवसेना (उबाठा)चिखली तालुका महिला आघाडी प्रमुख अनिता येवले सुद्धा सहभागी झाल्या आहेत. आठवड्यातील प्रत्येक रविवारी दोघेही सक्तीने मोबाईल बंदी पाळणार आहेत. येवले दाम्पत्य दोघेही महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. मोबाईल वापरणे त्यांना गरजेचा आहे; मात्र तरीसुद्धा त्यांनी मोबाईलचा उपवास करण्याचा संकल्प घेतला आहे. इतरांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे.
