येळगाव धरण ओव्हरफ्लाे, पाच गेट उघडले;बुलढाणेकरांची पाण्याची चिंता मिटली; १५ गावांनाही मिळाला दिलासा !

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरासह १५ गावांना पाणीपुरवठा करणारे येळगाव धरण ओव्हर फ्लाे झाले आहे.  प्रकल्पाचे पाच गेट उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे, बुलढाणा शहरातील नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे. 
बुलढाणा नगर पालिकेच्या येळगाव प्रकल्पाच्या परिसरात दमदार पाउस झाल्याने जलपातळीत वाढ झाली आहे.प्रकल्पात आवक सुरूच असल्याने प्रकल्पाचे गेट उघडण्यात असून विसर्ग सुरू आहे. या धरणातून बुलढाणा परिसरातील १५ गावांनाही पाणीपुरवठा करण्यात येताे. यंदा प्रकल्प सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ओव्हर फ्लाे झाला आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे.

बुलढाणा शहरातील लोकसंख्येच्या विचार करता दरडोई १०० लिटर प्रमाणे दररोज ७० लाख लिटर्स पेक्षा जास्त पाण्याची गरज असते. याशिवाय येळगाव धरणातून अजिसपूर, नांद्राकोळी, साखळी
बु., सागवन, कोलवड देऊळघाट, बिरसिंगपूर, येळगाव, सुंदरखेड, भादोला, माळविहिर, अंत्री तेली, जांभरुणला येळगाव धरणातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे धरणातून दररोज ९० लाख लिटर्सपेक्षा जास्त पाण्याची उचल होते. धरणाची पाणी साठवण क्षमता १२.४० दलघमी आहे. येळगाव धरणामुळे आजूबाजूचा परिसर सुजलाम सुफलाम झाला आहे.   यावर्षी पावसाळा सुरू होवून जवळपास
दीड महिन्याच्या कालावधी होऊनही येळगाव धरणातील जलसाठ्यात वाढ झाली नाही. दरम्यान, सोमवारी रात्री पडलेल्या दमदार पावसामुळे येळगाव धरणात पाणी विसर्ग सुरू असून आतापर्यंत १०० टक्के जलसाठा आल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे धरणाचे पाच गेट उघडण्यात आले असून विसर्ग सुरू आहे.