कर्जमाफी द्या नाहीतर गांजा पिकवू द्या! सरपंच सुवर्णा टापरेंसह शेतकऱ्यांची मागणी; तहसीलदारांना दिले निवेदन...

 
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कर्जमाफी आणि अन्य प्रलंबित मागण्या शासनाने तातडीने पूर्ण कराव्यात, अन्यथा शेतकऱ्यांना गांजा पिकवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी  पिप्री काथरगावच्या सरपंच सौ. सुवर्णा गणेश टापरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनातून केली.
गुरुवारी तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, यंदा सततच्या पावसामुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही. तरीसुद्धा बँका कर्जवसुलीचा तगादा लावत आहेत. त्यामुळे कर्जवसुली तात्काळ थांबवून सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, मागील वर्षी पिकविमा देताना मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विमा भरपाई सरसकट देण्यात यावी. सरकारने कापूस आणि सोयाबीनसाठी हमीभाव जाहीर केला असला तरी खरेदी केंद्रे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आपला माल व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागला. अशा शेतकऱ्यांना भावफरकाची रक्कम मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच, राज्य शासनाने जाहीर केलेली रब्बी हंगामातील दहा हजार रुपये प्रति हेक्टर नुकसानभरपाई संग्रामपूर तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना देण्यात यावी, प्रलंबित पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करावीत, तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेतील केवायसीची अट रद्द करून सर्व पात्र महिलांना लाभ द्यावा, अशाही मागण्या करण्यात आल्या.
या मागण्या मान्य न झाल्यास पंधरा दिवसांत तहसीलसमोर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच सुवर्णा टापरे यांच्यासह ५० शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदन सादर करताना शेकडो शेतकरी उपस्थित होते.