पंचायत समित्यांवर महिला राज, १३ पैकी ७ समित्यांचे सभापतीपद महिलांसाठी राखीव; पंचायत समिती सभापतींचे आरक्षण जाहीर; नांदुरा, चिखली, खामगाव, शेगाव, लाेणार दे. राजा, जळगाव जा.चा समावेश...

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पाेहचली असून १३ ऑक्टाेबर राेजी जिल्ह्यातील १३ ही पंचायत समित्यांच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. १३ पैकी ७ पंचायत समित्यांच्या सभापतीपदी महिलांची वर्णी लागणार आहे. या आरक्षणामुळे अनेकांना धक्का बसला असून काहींना संधी उपलब्ध झाली आहे.
जिल्हा परिषदेबराेबरच पंचायत समित्यांची निवडणुक येत्या काही दिवसात हाेणार आहे. या निवडणुकीसाठी तयारी करीत असलेल्या इच्छुकांचे लक्ष साेमवारी निघणाऱ्या आरक्षण साेडतीकडे लागले हाेते. जिल्हा परिषद गटांचे आरक्षण जाहीर करण्यापूर्वीच पंचायत समित्यांचे सभापती आणि गणांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांचे सभापती आणि सदस्यपदासाठी आरक्षण काढण्यात आले. यामध्ये नांदुरा, चिखली, खामगाव, शेगाव, लाेणार, देउळगाव राजा, जळगाव जामाेद येथील सभापतीपद महिलांसाठी राखीव झाले आहे. तसेच बुलढाणा, माेताळा, मेहकर, सिंदखेड राजा, मलकापूर आणि संग्रामपूर येथे महिला आणि पूरूष दाेघांनाही संधी मिळणार आहे.

पंचायत समितीनिहाय असे निघाले सभापतीपदासाठी आरक्षण
१. बुलढाणा – अनुसूचित जाती
२. नांदुरा – अनुसूचित जाती (महिला)
३. मोताळा – अनुसूचित जाती
४. चिखली – अनुसूचित जमाती (महिला)
५. खामगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
६. मेहकर - नागरिकांचा मागास प्रवर्ग
७. शेगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
८. देऊळगावराजा – सर्वसाधारण (महिला)
९. लोणार – सर्वसाधारण (महिला)
१०. सिंदखेडराजा - सर्वसाधारण
११. मलकापूर - नागरिकांचा मागास प्रवर्ग 
१२. जळगांव जामोद - सर्वसाधारण (महिला)
१३. संग्रामपूर – सर्वसाधारण