मेहकरात भर रस्त्यावर महिलेची प्रसूती! ग्रामीण रुग्णालय अवघ्या ५० मीटरवर; मदतीसाठी गेलेल्या व्यक्तीला ‘डॉक्टर नाहीत’ म्हणत कर्मचाऱ्याचा नकार? प्रसूतीच्या वेदनांनी महिला रस्त्यावर तडफडत होती;
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला प्रसूतीच्या वेदनांनी अक्षरशः तडफडत होती. तिची अवस्था पाहून योगेश सौभगे यांनी तातडीने मेहकर ग्रामीण रुग्णालय गाठले आणि घटनास्थळी येऊन महिलेला मदत करण्याची विनंती केली. मात्र, ‘डॉक्टर उपलब्ध नाहीत’ असे सांगून महिला कर्मचाऱ्याने घटनास्थळी येण्यास नकार दिल्याचा आरोप सौभगे यांनी माध्यमांशी बोलताना केला.
हाकेच्या अंतरावर रुग्णालय... तरीही रस्त्यावर प्रसूती!
एका बाजूला महिला प्रसूतीच्या वेदनांनी विव्हळत होती, तर दुसऱ्या बाजूला अवघ्या काही अंतरावर शासकीय ग्रामीण रुग्णालय होते. मात्र, तातडीची वैद्यकीय मदत मिळू न शकल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली. अखेर खासगी रुग्णालयातील नर्सला घटनास्थळी बोलावण्यात आले. तिच्या मदतीने रस्त्यावरच महिलेची प्रसूती करण्यात आली.
यानंतर महिला आणि नवजात बाळाला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आरोग्य यंत्रणेच्या भूमिकेवर नागरिकांचा संताप
या घटनेनंतर मेहकर शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांची भूमिका काय असते? ग्रामीण रुग्णालयात आवश्यक वेळी डॉक्टर उपलब्ध होते का? आणि उपलब्ध नसतील तर पर्यायी वैद्यकीय व्यवस्था का करण्यात आली नाही? असे अनेक सवाल या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.
विशेषतः रुग्णालयापासून काहीच अंतरावर महिलेची प्रसूती होणे ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. संबंधित कर्मचाऱ्याने मदतीसाठी केलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष केले का, याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.माजी आमदार संजय रायमुलकरांनी घेतली दखल
दरम्यान, मेहकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. सामान्य नागरिकांना ग्रामीण रुग्णालयाच्या कारभारामुळे त्रास होत असल्यास त्याकडे लक्ष देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आता या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून घटनेच्या वेळी ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर व संबंधित कर्मचारी उपस्थित होते का, मदतीची मागणी करण्यात आली होती का आणि त्यावर नेमकी काय कार्यवाही झाली, याची सत्यता तपासण्याची मागणी होत आहे.
महिला आणि बाळाची प्रकृती सध्या कशी आहे, याबाबत अधिकृत आरोग्य विभागाकडून माहिती समोर आलेली नाही. मात्र, ‘रुग्णालय हाकेच्या अंतरावर असताना महिलेची रस्त्यावर प्रसूती का झाली?’ हा सवाल आता मेहकरच्या आरोग्य व्यवस्थेसमोर उभा ठाकला आहे.