सहा महिन्यातच टेंभुर्णा - खामगाव रस्ता खड्डेमय;निकृष्ट काम झाल्याची लोकांमध्ये कुजबुज; प्रशासनाकडून कारवाईची मागणी..!
Aug 20, 2025, 17:51 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खामगाव - टेंभुर्णा रस्त्याचे काम अवघ्या चार महिन्यापूर्वीच करण्यात आले होते.मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे काही महिन्यातच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत.शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण संबंधित ठेकेदारावर कारवाई करणार का? असा सवाल आता विचारला जात आहे.
खामगाव - अकोला नॅशनल हायवे महामार्ग असलेल्या टेंभुर्णा पर्यंतचा हा मार्ग परिसरातील एक महत्त्वाचा संपर्क रस्ता मानला जातो. शेतकरी ,व्यापारी, विद्यार्थी यासह सर्वसामान्य नागरिकांची याच रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून मागील सहा महिन्यापूर्वीच लाखो रुपये खर्चून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. पावसाळा सुरु होताच या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. पावसाचे पाणी ठिकठिकाणी खड्ड्यात साचत आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेल्याची ओरड आता होऊ लागली आहे.सरकारकडून कोट्यावधींचा निधी मंजूर होऊनही जर पाच - सहा महिन्यातच रस्ते खराब होणार असतील तर हा निधी कुठे जातो? असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.