सिंचन विहिरींचे जिओ टॅगिंग करण्यासाठी कोण मागतंय पैसे? भाजप मंडळ अध्यक्ष शिवाजी वाघांनी बिडीओंना विचारला जाब! म्हणाले,चौकशी करुन कारवाई करा..नाहीतर आंदोलन करू
Jan 1, 2026, 10:37 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मंजूर झालेल्या सिंचन विहिरींचे जिओ टॅगिंग करण्यासाठी पैसे मागण्यात येत असल्याचा आरोप भाजपच्या साखरखेर्डा मंडळाचे अध्यक्ष शिवाजी वाघ केला आहे. त्यासंबंधीचे एक निवेदन चिखली पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना देण्यात आले. संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचे शस्त्र हाती घेऊ असा इशाराही वाघ यांनी दिला आहे.
शेळगाव आटोळ येथे दीड वर्षांपूर्वी सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. मात्र या विहिरींचे अद्यापही जिओ टॅगिंग झालेले नाही. मंजूर सिंचन विहिरींचे जिओ टॅगिंग करण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या नावे शेतकऱ्यांना हजारो रुपयांची मागणी करण्यात येत आहे. पैशांची पूर्तता न झाल्यास मंजुरात असलेली सिंचन विहीरनाम अजून करण्यात येईल अशी धमकीही देण्यात येत असल्याच्या तक्रारी असल्याचे शिवाजी वाघ यांनी निवेदनात म्हटले आहे. अशा धमक्यांमुळे शेतकरी भयभीत आहेत, त्यामुळे आपल्या स्तरावरून या प्रकरणांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आपल्या कार्यासमोर पीडित शेतकऱ्यांसह आंदोलन करू असा इशारा शिवाजी वाघ यांनी दिला आहे.
