व्हीप एकाचा, स्वीकृत दुसराच; मलकापूर पालिकेत काँग्रेसची अंतर्गत गटबाजी उघड, निवडीदरम्यान तणाव...
Jan 14, 2026, 20:01 IST
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : मलकापूर नगरपालिकेत मंगळवारी पार पडलेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आणि स्वीकृत नगरसेवकांच्या घोषणेदरम्यान काँग्रेस पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. विशेषतः काँग्रेसकडून स्वीकृत सदस्य म्हणून नाव जाहीर होताच नगर परिषद परिसरात झालेल्या घोषणाबाजी व गोंधळामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
नगरपालिका उपाध्यक्षपदी काँग्रेसकडून अनिल गांधी यांची निवड झाल्यानंतर स्वीकृत सदस्यांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेसकडून स्वीकृत सदस्य म्हणून अॅड. शाहिद शेख यांचे नाव जाहीर होताच काँग्रेसच्या काही नाराज कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळामागे पक्षातील अंतर्गत निर्णय प्रक्रियेबाबतचा असंतोष असल्याचे स्पष्ट झाले.
काँग्रेस पक्षाकडून स्वीकृत सदस्यपदासाठी विनय काळे यांचे नाव पक्षाच्या व्हीपद्वारे अधिकृतरीत्या सुचविण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष सभागृहात वेगळ्याच नावाची घोषणा झाल्याने पक्षाचा व्हीप डावलण्यात आल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. “हा निर्णय मान्य नाही”, “कार्यकर्त्यांचा अपमान बंद करा” अशा घोषणा देत संतप्त कार्यकर्त्यांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली.

काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा ऐरणीवर या प्रकारामुळे काँग्रेस पक्षातील गटबाजी, समन्वयाचा अभाव आणि नेतृत्व व कार्यकर्त्यांमधील दरी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची भावना अनेकांनी उघडपणे व्यक्त केली. निर्णय घेताना कार्यकर्त्यांना विश्वासात न घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. नाराजी इतकी तीव्र होती की घोषणाबाजी थेट पक्ष नेतृत्वाविरोधात जात असल्याचे चित्र दिसून आले. या संपूर्ण गोंधळादरम्यान प्रशासनाकडून कोणताही ठोस हस्तक्षेप झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवरही नगर परिषद वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
इतर पक्षांचे स्वीकृत सदस्य; मात्र लक्ष केंद्रित काँग्रेसवरच
दरम्यान, भाजपकडून शिवराज जाधव, तर राष्ट्रवादी काँग्रेस (आघाडी) कडून प्रसाद जाधव यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली. मात्र नगर परिषदेत निर्माण झालेल्या गोंधळाचे केंद्रबिंदू काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष हेच ठरले.
पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य यांसारख्या मूलभूत नागरी प्रश्नांऐवजी पदे व स्वीकृत सदस्यत्वावरून सुरू असलेल्या अंतर्गत राजकारणामुळे नगर परिषदेच्या कामकाजावर विपरित परिणाम होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.काँग्रेस नेतृत्वाने या अंतर्गत मतभेदांकडे गांभीर्याने लक्ष देत कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करावा, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.