पातोंडा–पेडक्यात चाललंय काय? गत अठ्ठेचाळीस तासांपासून काही घरांवर दगडफेक! दगडफेक करणारे कोण? ग्रामस्थांसमोर मोठा प्रश्न...

 
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पातोंडा–पेडका गावात गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून काही ठराविक घरांवर छोटे-मोठे दगड रात्रंदिवस भिरकावले जात आहेत. नेमकं हे करतं कोण? हा प्रश्न गावकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

गावात गेल्या दोन दिवसांपासून अनाकलनीय दगडफेकीच्या घटनांनी ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. थोड्या-थोड्या वेळाने हे दगड घरांच्या टिनपत्रांवर आदळत आहेत. काल रात्री खामगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. मात्र अद्याप दगडफेकीमागील हात कोणाचा याचा उलगडा झालेला नाही.गावकऱ्यांनी आजूबाजूच्या इमारती व परिसराची पाहणी केली; मात्र काहीच सुराग लागलेला नाही. दगडफेक काही काळ थांबते आणि पुन्हा सुरू होते, हे विशेष लक्षात येत आहे. काल रात्री गावकरी मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले होते, तरीही त्यांच्या उपस्थितीतही दगड येत राहिले. म्हणून नेमकं हे दगड कुठून येतात? हे करतं कोण? याचा तपास अद्याप सुरूच असून, ग्रामस्थांमध्ये प्रचंड संभ्रम आणि भीतीचे वातावरण आहे. घरांवर दगडफेक करणाऱ्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.