काय सांगता...? बुलढाण्यात चक्क रोबोटच्या मदतीने केली शस्त्रक्रिया! १६ कोटींच्या अत्याधुनिक रोबोटद्वारे पहिली सर्जरी यशस्वी; गोरगरीब रुग्णांनाही मिळणार लाभ?

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची मोठी घोषणा! ४७ चिमुकल्यांवर होणार मोफत हृदय शस्त्रक्रिया!
 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महानगरांतील मोठमोठ्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेली अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा आता बुलढाण्यात उपलब्ध झाली आहे. बुलढाणा येथील राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल १६ कोटी रुपये किमतीच्या भारतीय बनावटीच्या रोबोटद्वारे आज, २८ नोव्हेंबर रोजी पहिली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. विशेष म्हणजे, या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ गोरगरीब रुग्णांनाही मिळावा, यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत योजनेत रोबोटिक सर्जरीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली. दुसरीकडे, जन्मजात हृदयविकार असलेल्या ४७ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याने त्यांच्या पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोबोटिक सर्जरीचा शुभारंभ, टू-डी इको तपासणी शिबिर आणि एनएबीएल कार्यशाळेचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संजय गायकवाड, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अतिरिक्त महानिदेशक डॉ. माधुरी बरसगडे, उपनिदेशक डॉ. मेघा खोब्रागडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, जागतिक ख्यातीचे रोबोटिक सर्जन डॉ. सुधीर श्रीवास्तव, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, डॉ. गिरीश बक्षी, डॉ. अर्चना राठोड, डॉ. आशुतोष सिंह, डॉ. गायत्री, डॉ. श्वेता सिन्हा तसेच एस.एस. मंत्रा रोबोटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून एस.एस. मंत्रा रोबोटिक्स कंपनीने सुमारे १६ कोटी रुपये किमतीचा भारतीय बनावटीचा सर्जिकल रोबोट राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिला आहे. याच रोबोटच्या माध्यमातून आज शिवशंकर इंगळे यांच्या हर्नियाची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. भारतातील रोबोटिक शस्त्रक्रियेचे प्रवर्तक आणि जागतिक ख्यातीचे शल्यचिकित्सक डॉ. सुधीर श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत ही शस्त्रक्रिया पार पडली. राज्यातील अनेक नामवंत शल्यचिकित्सकांनीही या शस्त्रक्रियेची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहून घेतली.

वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानामुळे उपचार अधिक अचूक, सुरक्षित आणि परिणामकारक होत आहेत. रोबोटिक शस्त्रक्रियेमुळे रुग्णाच्या शरीराला तुलनेने कमी इजा होऊ शकते, वेदना कमी होतात आणि शस्त्रक्रियेतील अचूकता वाढते. मात्र, या अत्याधुनिक सुविधेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम रुग्णांपुरता मर्यादित राहू नये. सर्वसामान्य आणि गरजू रुग्णांनाही त्याचा लाभ मिळावा, यासाठी शासकीय आरोग्य योजनांमध्ये रोबोटिक सर्जरीचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे केंद्रीय राज्यमंत्री जाधव यांनी सांगितले.

बुलढाण्यासारख्या दुर्गम भागात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे ही महत्त्वाची बाब आहे. भविष्यात बुलढाणा येथे रोबोटिक सर्जरीचे प्रशिक्षण केंद्रही सुरू करण्यात यावे, अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली. दरम्यान, आयुष उपचारपद्धतीसाठीही भारतीय बनावटीचा रोबोट विकसित करण्याची इच्छा केंद्रीय मंत्री जाधव यांनी व्यक्त केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत आयुष क्षेत्रासाठी ‘सुश्रुत’ नावाचा रोबोट विकसित करण्याची तयारी एस.एस. मंत्रा रोबोटिक्स कंपनीने दर्शविली आहे.

दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहांतर्गत जन्मजात हृदयविकार असलेल्या बालकांसाठी मोफत तपासणी आणि शस्त्रक्रियेचा उपक्रम राबविण्यात येत आहे. राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी आयोजित टू-डी इको तपासणी शिबिरात ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या हृदयविकार तज्ज्ञांकडून बालकांची तपासणी करण्यात येत आहे. शिबिराच्या पहिल्याच दिवशी ६० बालकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४७ बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांची टीम कार्यरत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भागवत भुसारी, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील, आयोजन समितीचे प्रमुख डॉ. अजित शिरसाठ यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.बुलढाण्यात रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा सुरू झाल्याने जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात नवे पर्व सुरू झाले आहे. आता या शस्त्रक्रियांचा शासकीय आरोग्य योजनांमध्ये प्रत्यक्ष समावेश कधी होणार, याकडे सर्वसामान्य रुग्णांचे लक्ष लागले आहे.