विवेकानंद जयंती उत्सवाची उद्या महाप्रसादाने सांगता; ४० एकर शेतात तीन हजार स्वयंसेवक, २५० क्विंटल पुरी-भाजीचा महाप्रसाद...

 
हिवरा आश्रम (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  गत दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विवेकानंद जयंती महोत्सवाचा समारोप उद्या, शनिवार, १० जानेवारी रोजी पौष वद्य सप्तमीच्या दिवशी भव्य महाप्रसादाने होत आहे. विवेकानंद आश्रमात सुरू असलेल्या या उत्सवाला दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती लाभत आहे. विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते यांच्या हस्ते गुरुवारी मध्यरात्रीनंतर प्रथम पुरी कढईत टाकून महाप्रसाद तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया सलग सुरू राहून शनिवारी पहाटे ४ वाजेपर्यंत चालली. गावोगावाहून आलेल्या सुमारे पाच हजार स्त्री-पुरुष स्वयंसेवकांनी महाप्रसादाच्या तयारीसाठी आपली सेवा दिली.

संस्थेच्या तब्बल ४० एकर शेतजमिनीत १०० ट्रॅक्टरच्या सहाय्याने सुमारे तीन हजार स्वयंसेवकांच्या माध्यमातून आज दुपारी २ ते ५ या वेळेत भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. याआधी भाविकांचे गंध, फुले वाहून व अगरबत्ती लावून देव मानून पूजन केले जाते, ही या महोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे.
प. पू. शुकदास महाराज हे मानवसेवेलाच ईश्वरसेवा मानणारे आणि आयुष्यभर समाजसेवेसाठी झटणारे कर्मयोगी होते. त्यांनी १९६५ साली युवकांना संघटित करून सुरू केलेला विवेकानंद जयंती उत्सव व महाप्रसाद आज भव्य स्वरूप धारण करीत आहे. समाजातील जातिभेद, अंधश्रद्धा, स्त्री-पुरुष भेद नष्ट होऊन एकसंघ, सुज्ञ नवसमाजाची निर्मिती व्हावी तसेच दीन-दुःखी, दारिद्री नारायणाची सेवा व्हावी, या उद्देशाने या उत्सवाची सुरुवात करण्यात आली होती. एकेकाळी झोपडीच्या स्वरूपात असलेला विवेकानंद आश्रम आज विवेकानंद विचारांच्या प्रचाराचे मोठे केंद्र बनला आहे.
यावर्षी भाविकांची विक्रमी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन होणार आहे. त्यानंतर स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती यांचे काल्याचे कीर्तन, सायंकाळी ७ वाजता प. पू. शुकदास महाराजांचे संग्रहित आशीर्वचन सादर करण्यात येणार आहे. रात्री ८ वाजता प्रा. श्रीकांत रासेकर यांचे व्याख्यान तर रात्री ९ वाजता हभप रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनाने उत्सवाचा समारोप होईल.
महाप्रसादासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था नीट ठेवावी, स्वयंसेवकांना सहकार्य करावे तसेच महाप्रसादाची एकच पंगत होणार असल्याने शिस्त व नियोजनासाठी संस्था व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन विवेकानंद आश्रमाच्या वतीने करण्यात आले आहे. महाप्रसाद वितरणासाठी वाहतूक व्यवस्थेत करण्यात आलेल्या बदलांची भाविकांनी दखल घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.