विश्वदिप पडोळ यांची युवक काँग्रेसच्या महासचिवपदी निवड; प्रदेश संघटनात बुलढाण्याचा दबदबा; युवक काँग्रेसच्या प्रदेश राजकारणात बुलढाण्याचा आवाज बुलंद...
विश्वदिप पडोळ यांची ही नियुक्ती त्यांच्या सातत्यपूर्ण संघटनात्मक कामगिरीची पावती मानली जात आहे.
पक्षाच्या राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या मोहिमांमध्येही पडोळ यांनी सक्रिय भूमिका बजावली आहे. भारत जोडो यात्रा दरम्यान बुलढाणा तालुक्यात व्यापक जनसंपर्क साधत त्यांनी यात्रेचा प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले. ‘चलो पंचायत’ आणि ‘चलो वॉर्ड’ सारख्या अभियानांची चिखली विधानसभा मतदारसंघात प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण आणि शहरी भागात युवक काँग्रेसचे जाळे अधिक मजबूत केले. तसेच जिल्ह्यात आयोजित संविधान जागर यात्रेत सक्रिय सहभाग नोंदवत संविधान मूल्यांबाबत जनजागृती केली.
पडोळ यांनी केवळ राज्यापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय राजकारणातही आपला सहभाग अधोरेखित केला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान कस्तुरबा नगर मतदारसंघात त्यांनी प्रचाराचे नियोजन, बूथ व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांमधील समन्वयाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. त्यांच्या या कामगिरीमुळे पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापनात त्यांची क्षमता पुन्हा अधोरेखित झाली.
या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया देताना पडोळ यांनी सांगितले की, पक्षाने दिलेली ही जबाबदारी अधिक जोमाने पार पाडत युवक काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असून पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवतील. या प्रवासात जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.