धर्मदाय आयुक्त कार्यालयातील विजय नरवाडे यांची लाचेच्या आरोपातून निर्दोष सुटका... !ॲड.शर्वरी सावजी-तुपकर यांचा प्रभावी युक्तीवाद..
Nov 3, 2025, 10:29 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नोव्हेंबर सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, बुलडाणा येथे तत्कालीन कार्यरत असलेले अव्वल कारकून विजय पंढरी नरवाडे यांची न्यायालयाने लाचखोरीच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. विशेष न्यायालय बुलडाणाचे विशेष न्यायाधीश श्रीमती मंजुषा व्ही देशपांडे यांनी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला.
सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय, बुलडाणा येथे सन २०१३ मध्ये कार्यरत असलेले अव्वल कारकून विजय पंढरी नरवाडे यांच्या विरोधात खामगाव येथील रहिवासी शेखर ओमप्रकाश शर्मा यांनी लाच लुचपत विभाग बुलढाणा यांच्याकडे तक्रार दिली होती. त्यांना आदर्श बहुउद्देशीय संस्था खामगाव या नावाने धर्मदाय आयुक्त कार्यालय बुलढाणा येथे संस्थेची नोंदणी करावयाची होती. या संस्थेची नोंदणी करून देण्यासाठी सदर कार्यालयात कार्यरत असलेले अव्वल कारकून विजय नरवाडे यांनी त्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली असे शर्मा यांनी तक्रारीत नमूद केले होते.लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांनी २४जानेवारी २०१३ रोजी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय बुलढाणा येथे सापळा रचून कारवाई केली असता अव्वल कारकून विजय पंढरी नरवाडे यांनी दोन हजार रुपयाचे लाचेची मागणी करून लाच स्वीकारल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास अधिकारी - एस एल. मुंढे, डीवायएसपी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग बुलडाणा यांनी तपास पूर्ण केल्यानंतर तत्कालीन धर्मदाय आयुक्त मुंबई तथा मा. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री विश्वास जाधव यांनी खटला दाखल करण्यास मंजुरी प्रदान केली व सदर प्रकरण न्यायालयात सुरू झाले. याप्रकरणी सरकार पक्षा तर्फे फिर्यादी शेखर शर्मा , सापळा कारवाईतील पंच क्र. 1 सतिष कोल्हे, सक्षम अधिकारी मा. निवृत्त न्यायमूर्ती व्ही. के. जाधव व तपास अधिकारी मुंढे यांची साक्ष नोंदवीली. आरोपी विजय नरवाडे यांच्यावतीने ऍड. शर्वरी सावजी - तुपकर यांनी न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडली. आरोपीच्या वतीने युक्तिवाद करताना ऍड. शर्वरी सावजी - तुपकर यांनी न्यायालयाचे लक्षात आणून दिले की फिर्यादी शेखर शर्मा हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून खुनाच्या दोन प्रकरणांचा त्यांचेवर आरोप आहे, कथित लाचेची रक्कम आरोपी नरवाडे जवळ सापडलेली नाही तर कपाटात सापडलेली आहे व तिथे ती रक्कम कोणालाही ठेवता येते, यावरून आरोपीने लाच स्वीकारली हे सिद्ध होत नाही. तसेच फिर्यादीच्या संस्था नोंदणीचा प्रस्ताव मंजूर करायचा किंवा नाही हे आरोपीच्या हातात नाही त्यामुळे यासाठी आरोपीने लाच मागणे व घेणेचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय या प्रकरणाच्या तपासामध्ये खूप त्रुटी आहेत, सक्षम अधिकाऱ्यांनी विचार न करता मंजूरात प्रदान केलेली आहे त्यामुळे संशयाचा फायदा आरोपीस मिळावा असा प्रभावी युक्तीवाद ऍड. शर्वरी सावजी - तुपकर यांनी न्यायालयासमोर केला. फिर्यादीची गुन्हेगारी पार्श्वभूमी , साक्षीदारांच्या तोंडी पुराव्यातील तफावती, तपासातील व मंजुरी आदेशातील त्रुटी लक्षात घेऊन आरोपीची सदर गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली. त्यामुळे एका आरोपीने केलेल्या लाचेच्या आरोपातून मुक्त होण्यास आरोपी विजय नरवाडेला तब्बल १२ वर्ष लागले. ..
