बुलडाणा जिल्ह्यातील ३३ ग्रामीण रस्त्यांना दर्जोन्नतीची मान्यता; ९५ किलोमीटरच्या रस्त्यांना मिळणार विकासाची गती;

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा...
 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्यातील ३३ ग्रामीण रस्त्यांना दर्जोन्नत करण्यास राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय ३ ऑगस्ट रोजी निर्गमित झाला आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ९५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या विकासाला चालना मिळणार आहे.

या मान्यतेबद्दल केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज, २५ ऑगस्ट रोजी मुंबई येथील मंत्रालयात राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सदिच्छा भेट घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणीपत्र सादर करून चर्चा करण्यात आली.

ग्रामीण भागातील रस्ते हे विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून, या रस्त्यांमुळे गावांना मुख्य मार्गांशी जोडण्याबरोबरच नागरिकांना दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. कृषी मालाची वाहतूक, शैक्षणिक व आरोग्य सुविधा तसेच बाजारपेठांशी संपर्कासाठी या रस्त्यांचा मोठा फायदा होणार आहे.

दर्जोन्नतीस मान्यता मिळालेल्या रस्त्यांमध्ये लोणार तालुक्यातील आरडव ते मुख्य रस्ता ते अढाव मुख्य रस्ता, हत्ता ते पिंप्री खंडारे; सिंदखेड राजा तालुक्यातील चांगेफळ ते बोराखेडी गंडे; चिखली तालुक्यातील खंडाळा मकरध्वज ते खैरव फाटा, खंडाळा मकरध्वज ते गोद्री एमआयडीसी; बुलडाणा तालुक्यातील घाटनांद्रा ते उबरखेड, अंभोडा ते तांदुळवाडी, चिखला ते झरी, धाड ते मोहोज, अंत्री तेली ते केळवद शिवार, साखळी खुर्द ते तांदुळवाडी आदी रस्त्यांचा समावेश आहे.

मेहकर तालुक्यातील मादणी ते पिंपरपाधी, मादणी ते लेहणी, मादणी टी-पॉईंट ते मौंढाळा, मादणी ते वडजी, लेहणी शिव ते बेलजाई महादेव मंदिर, कल्याणा ते नेमतापूर, अंत्री देशमुख ते तुरखेड, अंत्री देशमुख ते बोरखेडी, वर्दडी वैराळ ते महोदरी, वर्दडी वैराळ ते आनंदवन महादेव खोरी, नांद्रा नजीक चायगाव ते कळपविहीर, नांद्रा चायगाव ते सायाळा, पेनटाकळी ते कासारखेड, पेनटाकळी ते कळंबेश्वर धरण, उसरण ते नागझरी, बाभुळखेड ते उसरण फाटा, थार ते धानोरी, डोणगाव ते लांडेवाडी, डोणगाव ते आंध्रुड, डोणगाव ते नागापूर आदी रस्त्यांचा समावेश आहे.

तसेच नांदुरा तालुक्यातील खंडाळा फाटा ते खडदगाव, पिंपळखुटा धांडे ते लोणवाडी आणि तरवाडी ते मेंढळी या रस्त्यांनाही दर्जोन्नतीची मान्यता देण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या वतीने सचिन जाधव व चंद्रकांत काटकर यांनी ग्रामविकास विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या रस्त्यांना मान्यता मिळाल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, बुलडाणा लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना अधिक बळकटी देण्यासाठी रस्ते विकासासोबतच ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्रांच्या विकासालाही निधी उपलब्ध करून देण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासकामांना आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.