केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची भरोसा येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना सांत्वनपर भेट; म्हणाले, शेतकऱ्यांनो टोकाची पावले उचलू नका, सरकार तुमच्या पाठीशी ...
Jul 28, 2025, 09:20 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):– चिखली तालुक्यातील भरोसा येथे आत्महत्या केलेल्या शेतकरी दांपत्याच्या कुटुंबीयांना केंद्रीयमंत्री तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी रविवारी (२७ जुलै) भेट देत धीर दिला. या वेळी त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना टोकाची पावले उचलू नका असे आवाहन केले.
गत आठवड्यात भरोसा येथील शेतकरी गणेश श्रीराम थुट्टे (वय ५५) आणि पत्नी रंजना गणेश थुट्टे (वय ५०) यांनी हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पिकांचे नुकसान आणि वाढत्या कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळताच केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी भरोसा येथील थुट्टे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना शासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.
“निसर्गाचा प्रकोप झाला तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये. सरकार तुमच्या पाठीशी आहे, त्यामुळे असे टोकाचे पाऊल उचलू नका,” असे आवाहन श्री. जाधव यांनी शेतकऱ्यांना केले.