केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा एकतेचा संदेश; मान्यवरांनी दाखवली हिरवी झेंडी; सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त‘सरदार @150 युनिटी मार्च’उत्साहात संपन्न...

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  युवकांनी राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभागी व्हावे. सरदार पटेल यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन भारताच्या एकतेचा आणि स्वावलंबी भविष्यासाठीच्या संकल्पाचा संदेश आत्मसात करावा, असे प्रतिपादन केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केले.
 केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणाल्या, पदयात्रेचे उद्दिष्ट तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना, सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि एकतेचा संदेश पोहोचविणे हे असून, संपूर्ण राज्यात 25 नोव्हेंबरपर्यंत जिल्हास्तरीय पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान गुजरातमधील करमसदपासून ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ केवडिया येथे राष्ट्रीय पदयात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या पदयात्रेत उत्स्फुर्तने सहभागी होऊन सरदार पटेल यांच्या कार्य जनसामान्यपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन क्रीडा राज्यमंत्री यांनी केले. 

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त “सरदार @150 युनिटी मार्च” अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन जनता कला वाणिज्य महाविद्यालय, मलकापूर येथे करण्यात आले होते. या पदयात्रेला केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे व आमदार चैनसुखी संचेती यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. 

या पदयात्रेत मलकापूरमधील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, युवक संघटना, स्वयंसेवक, एनएसएस, एनसीसी सदस्य, वारकरी मंडळी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पदयात्रेदरम्यान “भारत माता की जय”, “वंदे मातरम” या घोषणांनी वातावरण देशभक्तीने भारून गेले. पदयात्रेचा समारोप मातृ मंडळ, चाळीस बिगा येथे झाला. या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, जिल्हा क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर, जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवे उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाच्या प्रारंभी सरदार पटेल यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य आणि देशभक्तिपर गीत सादर करण्यात आले.