खामगाव–जालना रेल्वे मार्गासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व आमदार श्वेताताई महाले यांनी घेतली भेट !
या पार्श्वभूमीवर येत्या अर्थसंकल्पात खामगाव–जालना रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी १६ डिसेंबर रोजी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार श्वेताताई महाले पाटील, विद्याधरजी महाले, डॉ. आशुतोष गुप्ता, गोपाल तुपकर, शेख अनिस शेख बुढन, रेणुकादास मुळे, डॉ. किशोर वळसे उपस्थित होते.
रेल्वेमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांसह माझीही खामगाव–जालना रेल्वे मार्ग व्हावा, अशी तीव्र अपेक्षा आहे. हा विषय केवळ विकासाशीच नव्हे, तर लोकभावनेशीही संबंधित आहे. हा रेल्वे मार्ग विदर्भ व मराठवाडा या दोन विभागांना जोडणारा असून, मध्य रेल्वे व दक्षिण मध्य रेल्वे मार्गांनाही जोडणारा ठरणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या मध्य व दक्षिण रेल्वे मार्गांतील अंतर कमी करण्यासही हा मार्ग उपयुक्त ठरेल.
बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ असून, लोणार येथे खाऱ्या पाण्याचे जगप्रसिद्ध सरोवर आहे, तर शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे समाधीस्थळ आहे. या ऐतिहासिक, धार्मिक व पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यास व्यापार, पर्यटन, कृषी उत्पादन तसेच औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल.
या रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वे लोकआंदोलन समितीचे सदस्य, विविध सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील नागरिक सातत्याने भेट घेऊन मागणी करीत आहेत. हा मार्ग दीर्घकाळ प्रलंबित असल्याबद्दल नागरिकांमध्ये चिंता आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या धोरणानुसार येत्या अर्थसंकल्पात खामगाव–जालना रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात आले.
सलग दुसऱ्या दिवशी रेल्वेमंत्र्यांची भेट
खामगाव–जालना रेल्वे मार्गासाठी अर्थसंकल्पात निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी १५ डिसेंबर रोजी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेण्यात आली होती. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी पुन्हा आमदार श्वेताताई महाले पाटील, श्री. विद्याधरजी महाले, डॉ. आशुतोष गुप्ता, श्री. गोपाल तुपकर, शेख अनिस शेख बुढन, श्री. रेणुकादास मुळे, डॉ. किशोर वळसे यांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील नागरिकांची लोकभावना मांडण्यात आली. या भेटीतही खामगाव–जालना रेल्वे मार्गासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ठाम मागणी करण्यात आली.
