आ.सिद्धार्थ खरातांवर उद्धव ठाकरेंचा विश्वास; महापालिका निवडणुकीसाठी सोपवले मोठे काम..!
Jan 2, 2026, 11:36 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने महाराष्ट्रभर प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या महत्त्वपूर्ण यादीत मेहकर–लोणार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात यांचा समावेश झाल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.
महानगरपालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत पक्षाची धुरा सांभाळणाऱ्या नेत्यांमध्ये आमदार खरात यांना स्थान मिळणे, हे त्यांच्या राजकीय कार्यकौशल्याची व पक्षातील वाढत्या प्रभावाची पोचपावती मानली जात आहे. विशेषतः मेहकर नगरपरिषद निवडणुकीनंतर पक्ष संघटन मजबूत करण्यात त्यांनी बजावलेली भूमिका लक्षवेधी ठरली आहे.
या निवडीमुळे आमदार सिद्धार्थ खरात यांचे पक्षातील राजकीय वजन निश्चितच वाढल्याचे चित्र असून, शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाच्या आगामी निवडणूक रणनीतीत त्यांची भूमिका अधिक निर्णायक राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
स्टार प्रचारक म्हणून मिळालेल्या या जबाबदारीबद्दल आमदार सिद्धार्थ खरात यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
