लोणार-वडगाव तेजन मार्गावर दोन दुचाकींची भीषण धडक; चार युवक जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक! अवघ्या ७ किमी अंतरासाठी रुग्णवाहिकेला तासभर विलंब...

 
लोणार (प्रेम सिंगी: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)लोणार-वडगाव तेजन मार्गावर सकाळी १० वाजताच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात खामगाव येथील दोन युवकांसह शारा येथील दोन युवक असे चार जण जखमी झाले असून, खामगाव येथील दोन्ही युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, मोटरसायकल क्रमांक MH 28 K 2858 ही खामगावकडून लोणारच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या MH 28 AR 2458 क्रमांकाच्या मोटरसायकलला धडकली. या धडकेत दोन्ही दुचाकींवरील चारही युवक जखमी झाले. एका युवकाच्या डोळ्याला दुखापत झाली असून शारा येथील युवकांच्या हात-पायाला मार लागला आहे. अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, अपघातानंतर नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला; मात्र नागरिकांच्या म्हणण्यानुसार रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल एक तास लागला. विशेष म्हणजे, अपघाताचे ठिकाण लोणारपासून वडगाव तेजनच्या दिशेने अवघे ७ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमींना तातडीच्या उपचारांची गरज असताना एवढ्या कमी अंतरासाठी रुग्णवाहिकेला तासभर लागल्याने आपत्कालीन आरोग्य सेवेच्या तत्परतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अपघाताच्या वेळी रुग्णवाहिका नेमकी कुठे होती, आपत्कालीन कॉल मिळाल्यानंतर ती किती वेळाने रवाना झाली आणि घटनास्थळी पोहोचण्यास विलंब का झाला, याची प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, चारही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून खामगाव येथील दोन युवकांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे.