“शाखानिहाय बांधणी घट्ट करा, शिवसेनेचा भगवा फडकवा!” — खासदार अरविंद सावंत यांचे आवाहन..!

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : “शेती आणि मातीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून, हे सरकार म्हणजे केवळ थापाड्या सरकार आहे. उद्धवसाहेबांच्या काळात शेतकऱ्यांना थेट कर्जमाफी देण्यात आली होती. आज पुन्हा मायबाप शेतकऱ्यांच्या हक्कासाठी हा लढा बुलंद करण्याची वेळ आली आहे,” असे प्रतिपादन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख व खासदार अरविंद सावंत यांनी केले.
शेगाव येथील विश्राम भवनात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील आढावा बैठकीत बोलत होते. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांकडून सुमारे पाच तास सविस्तर आढावा घेतला.

खासदार सावंत म्हणाले, “महायुती सरकारने लोकप्रिय घोषणांच्या नावाखाली फसव्या आश्वासनांची माळ लावली आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे राज्यातील शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत खरी कर्जमाफी आणि ठोस मदत देण्याची गरज आहे.”

तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले, “संघटनेची खरी ताकद म्हणजे आपले पदाधिकारी, शिवसैनिक आणि कार्यकर्ते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाखानिहाय आणि विभागनिहाय संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करून जोमाने कामाला लागा.”

या बैठकीला उपनेते आमदार नितीनबापू देशमुख, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील, डी.एस. लहाने, जिल्हा संघटक गोपाल बच्छिरे, ॲड. सुमित सरदार, महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ. चंदाताई बढे, सौ. विजयाताई खडसन, युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कऱ्हाडे, प्रा. आशिष रहाटे, गजानन धांडे यांच्यासह सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, विभागप्रमुख, महिला आघाडी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.