‘हा अर्थसंकल्प जनतेसाठी नव्हे, उद्योगपतींसाठी!’ केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ चा शिवसेना (उद्धव ठाकरे) कडून तीव्र निषेध; महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्नांवर सरकार अपयशी – जयश्री शेळके

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षांवर पाणी फेरणारा असून, तो काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच सादर करण्यात आला आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केला आहे. महागाई, बेरोजगारी, शेतमालाला मिळणारा कमी दर, शिक्षण व आरोग्य व्यवस्थेतील ढासळती अवस्था या ज्वलंत प्रश्नांवर या अर्थसंकल्पात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी केला.
पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाच्या गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य नागरिक आधीच हैराण असताना, या अर्थसंकल्पातून जनतेला कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. उलट महागाईवर नियंत्रण ठेवण्याबाबत सरकारकडे ठोस धोरणच नसल्याचे या अर्थसंकल्पातून स्पष्ट होते, असेही शेळके यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांसाठी केवळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आला असून, कर्जमाफी, हमीभाव आणि उत्पादन खर्चावर आधारित दर यासंदर्भात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकरीविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.

रोजगारनिर्मितीबाबत केवळ पोकळ आश्वासने देण्यात आली असून, प्रत्यक्षात नोकऱ्या निर्माण करणारी कोणतीही ठोस योजना दिसून येत नाही. शिक्षण आणि आरोग्य क्षेत्राला पुरेसा निधी न देता सरकार खासगीकरणाला चालना देत असल्याने गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेवर मोठे आर्थिक ओझे येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

हा अर्थसंकल्प म्हणजे ‘कॉर्पोरेट साथ, कॉर्पोरेट विकास’ असून, सर्वसामान्य जनता, शेतकरी, कामगार, युवक आणि महिलांच्या हिताकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या जनविरोधी अर्थसंकल्पाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे, असेही जयश्री शेळके यांनी स्पष्ट केले.