मोहना खुर्द, जनुना, शेंदला शिवारात चोरट्यांचा धुमाकूळ; शेतकऱ्यांचे सिंचन साहित्य लंपास!
सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज असल्याने शेतकरी तुषार सिंचन संचाच्या माध्यमातून पिकांना पाणी देत आहेत. मात्र, शेतात उभारलेले तुषार सिंचन संच आणि अंथरलेले पाईप चोरट्यांच्या निशाण्यावर आले आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरटे शेतात ठेवलेले अॅल्युमिनियम व प्लास्टिकचे पाईप, नोझल तसेच विद्युत केबल्स लंपास करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
हजारो रुपयांचे नुकसान; पिकांना पाणी देणे झाले कठीण
शेतीचा वाढता खर्च आणि उत्पादनाला मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहे. अशातच हजारो रुपये खर्च करून खरेदी केलेले सिंचन साहित्य चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. चोरीमुळे पिकांना वेळेवर पाणी देणेही कठीण झाले असून, पाण्याअभावी पिके सुकण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात जागता पहारा देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भंगार बाजारात चोरीचे साहित्य विक्रीचा संशय
चोरी करण्यात आलेले पाईप, केबल्स व इतर साहित्य भंगार बाजारात कमी किमतीत विकले जात असल्याचा संशय शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घेऊन चोरट्यांचा शोध घ्यावा, तसेच ग्रामीण भागात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.