पहुरजिरा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; एका रात्रीत फोडली तीन घरे...

 
जलंब (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेगाव तालुक्यातील पहुरजिरा येथे १० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत तीन घरांमध्ये घरफोडी केल्याची घटना घडली. या तिहेरी चोरीत एकूण ९५ हजार ३५० रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी सीताराम नारायण कोंडे (वय ७०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते पत्नीसह पहुरजिरा येथे वास्तव्यास आहेत. १० एप्रिल रोजी पहाटे सुमारे ३ वाजताच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कोंडे दाम्पत्याला जीवे मारण्याची धमकी देत कपाटातील ३० हजार रुपयांची रोकड, पत्नीच्या अंगावरील सुमारे २० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पाटल्या तसेच अंदाजे २५० रुपये किमतीचे धातूचे मंगळसूत्र असा एकूण ५० हजार २५० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून नेला.

याच रात्री चोरट्यांनी गावातील आणखी दोन घरांनाही लक्ष्य केले. महादेव रामदास वाशिमकर यांच्या घरातील कपाटातून २२ हजार ४०० रुपयांची रोकड चोरून नेण्यात आली, तर सुनील चंद्रभान सुरडकार यांच्या घरातून २२ हजार ७०० रुपये लंपास करण्यात आले. एका रात्रीत सलग तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सीताराम कोंडे यांच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.