"रिंग रोडच्या कामात हलगर्जीपणा चालणार नाही! आमदार संजय गायकवाडांची अचानक पाहणी; कंत्राटदारांना कडक इशारा, गुणवत्तेशी तडजोड केली तर होणार कारवाई"
बुलढाणा शहरातील आयटीआय कॉलेजपासून सुरू असलेल्या रिंग रोड सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांनी राजमाता चौक परिसराला भेट देत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित शासकीय अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांकडून कामाच्या प्रगतीची सविस्तर माहिती घेतली.
पाहणीदरम्यान रस्त्याच्या बांधकामासाठी वापरण्यात येणारे साहित्य, तांत्रिक निकष, सिमेंट काँक्रीटची जाडी, मजबुती आणि कामाची गुणवत्ता याबाबत आमदार गायकवाड यांनी बारकाईने माहिती घेतली. प्रत्येक टप्प्यावर दर्जेदार काम होणे आवश्यक असून निकृष्ट काम करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी त्यांनी कंत्राटदारांना सुनावत, विकासकामे वेळेत पूर्ण करणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच त्यांचा दर्जा राखणेही आवश्यक असल्याचे सांगितले. नागरिकांच्या कररूपी पैशातून उभारल्या जाणाऱ्या प्रत्येक विकासकामाचा दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे. त्यामुळे गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे निर्देश त्यांनी संबंधितांना दिले.याशिवाय रस्त्याचे काम निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांसाठी लवकरात लवकर खुले करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर प्रभाग क्रमांक ८ मधील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होणार असून परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सुधाकर आहेर, नगरपालिका अभियंता अजय मापारी, पाणीपुरवठा विभागाचे राजू गायकवाड, शासकीय कंत्राटदार अश्रुबा शेवाळे (मामा), आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल, प्रतीक झाल्टे, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी, नगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रिंग रोडवरील सिमेंट काँक्रीट रस्ता दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्यास या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, तसेच नागरिकांना दीर्घकाळ टिकणाऱ्या आणि सुरक्षित पायाभूत सुविधांचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा उपस्थित नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.