बोरखेड–मोताळा मार्गावर एसटी बसमध्ये विद्यार्थ्यांना जागाच नाही; विद्यार्थ्यांना घ्यावा लागतो खासगी वाहनांचा आधार!

 
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : एसटी महामंडळाच्या सवलतींचा लाभ प्रवाशांना व्हावा म्हणून सरकार प्रयत्न करत असताना, मोताळा तालुक्यातील मोताळा–बोरखेड मार्गावर मात्र परिस्थिती पूर्ण उलट दिसते. विद्यार्थ्यांनी मासिक पास काढूनही त्यांना बसमधून प्रवास करता येत नाही! कारण — बसच फुल्ल भरलेली असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घेत दुहेरी भुर्दंड सहन करावी लागत आहे.
प्रवाशांची संख्या वाढली, पण बसेस मात्र जुन्याच. सकाळच्या गर्दीत विद्यार्थी, नोकरदार आणि शेतकरी सर्वजण एका बसमध्ये ठासून भरले जातात. मलकापूर आगाराची सकाळी ९ वाजताची मोताळा–बोरखेड बस म्हणजे प्रवाशांसाठी “ छळछावणी” ठरली आहे. बोरखेड आणि तारापूर येथून बस पूर्णपणे भरून जाते, त्यामुळे तरोडा आणि पुढील गावांतील प्रवासी चढूही शकत नाहीत.

बस इतकी गच्च की श्वास घेणंही कठीण! प्रवासादरम्यान उभं राहून प्रवास करणं म्हणजे जिवाशी खेळ. त्यात तिकीट तपासणी, वेळेचा विलंब आणि विद्यार्थ्यांची शाळा चुकणे — ही रोजची कहाणी झाली आहे.
पालकांचा संताप उफाळला असून त्यांनी “विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सुरू करा!” अशी मागणी वारंवार केली आहे. मात्र, आगार प्रमुख कानावर हात ठेवून गप्प, अशी परिस्थिती आहे.

“विद्यार्थ्यांचा प्रवास हा सुविधा नव्हे, हक्क आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग पत्करू,” असा इशारा स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

आगार प्रमुखांची टोलवाटोलवी
परिसरातील पालकांनी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सुरू करा अशी मागणी मलकापूर आगार प्रमुख यांच्याकडे केली.मात्र, या मागणीवर तोडगा काढण्याऐवजी टोलवाटोलवी सुरू आहे.त्यामुळे या मार्गावर विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत.याकडे एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पालकांनी केली आहे.