समृद्धी महामर्गालगत पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्थाच नाही; दुसरबीड परिसरातील पिके गेली पाण्यात; शेतकरी संकटात!

 
दुसरबीड (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : समृद्धी महामार्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी डाेकदुखी ठरत आहे. समृद्धी अंडपासमध्ये पाणी साचत असल्याने शेतकऱ्यांना चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. त्यातच दुसरबीड परिसरात पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने उपाययोजना न केल्यामुळे शेतातच पाणी साचून राहत असल्याने पिके पाण्यात गेलीआहेत. त्यामुळे, त्यावर तातडीने उपाय याेजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 
दुसरबीड येथील नागपूर कॉरिडॉरमधील चॅनेल क्र. ३१६ जवळील वर्दडी खुर्द शिवारात पावसाचे पाणी समृद्धी महामार्गावरून थेट शेतांमध्ये घुसल्याने गट क्रमांक २३, २४ आणि २५ येथील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मक्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत सर्व पिके पाण्याखाली गेल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. डोणगावलगत अंजनी परिसरातील अंडरपासमध्ये सर्वत्र चिखलच चिखल दिसत होता. तो शेवटी जेसीबी लावून काढण्यात आला. परंतु पाऊस आल्यानंतर पुन्हा हीच परिस्थिती येथे उद्भवणार आहे. त्यामुळे पाण्याच्या निचऱ्याचे योग्य पद्धतीने नियोजन करत उपाययोजना करण्याची मागणी हाेत आहे. शेतकरी बाबूराव साहेबराव खंदारे आणि तेजराव आत्माराम हिवाळे यांची पिके संपूर्णतः नष्ट झाली असून, समृद्धी महामार्गाच्या बांधकामात पाण्याचा निचरा विचारात न घेतल्याने ही स्थिती उद्भवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी तहसीलदार, सिंदखेड राजा यांच्याकडे लेखी निवेदन देऊन तत्काळ पंचनाम्याची मागणी केली आहे. यासोबतच नुकसानभरपाई देण्याची आणि अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी निचऱ्याची सोय करण्याची  मागणीही त्यांनी केली आहे.