नाल्यावरच पुलच नाही, जिव धोक्यात घालून विद्यार्थी जातात शाळेत; माेरखेड ते दुधलगाव रस्त्याची दुरवस्था; उद्धव सेनेने दिला आंदाेलनाचा इशारा..!

 
मलकापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)  : तालुक्यातील मोरखेड-दुधलगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, या रस्त्यावरील मरीमाता मंदिराजवळील साठीनाल्याच्या पाण्यातून विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागत आहे. या नाल्यावर तात्काळ पुलाचे बांधकाम करून पुढील रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर यांनी जि.प. बांधकाम विभागाचे अभियंता भागवत साळुंके यांच्याकडे केली आहे.मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन  करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. 
उद्धव सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोरखेड येथील सुमारे १२१ विद्यार्थी व विद्यार्थिनी दुधलगाव येथे शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. मात्र, मरीमाता मंदिराजवळील साठीनाल्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने विद्यार्थ्यांना पाण्यातूनच जाणे भाग पडते. त्यामुळे त्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाने दहा दिवसांत या नाल्यावर पुलाचे बांधकाम करून सदर रस्त्याचे रुंदीकरण करावे, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, शहरप्रमुख हरीदास गणबास, युवासेना शहरप्रमुख मंगेश सातव, गणेश उमाळे, उमेश सोनवणे आदी पदाधिकाऱ्यांनी नाल्याची पाहणी केल्यानंतर केली. मागणी निकाली न निघाल्यास १५ सप्टेंबरपासून शेतकरी, ग्रामस्थ तसेच विद्यार्थी यांच्या सहकार्याने उपोषण सुरू करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.