फत्तेपूर–निळेगाव रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे! वरचेवर डांबर टाकून काम पूर्ण केल्याचा ग्रामस्थांचा आरोप; कारवाईची मागणी...
Dec 6, 2025, 17:24 IST
खामगाव (भागवत राऊत : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : फत्तेपूर ते निळेगाव रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. फत्तेपूर गावापासून बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे अलीकडेच डांबरीकरण करण्यात आले. मात्र हे काम निकृष्ट झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या संदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करून कंत्राटदारावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, रस्त्यावर एक इंचाचा बेस लेयरही न टाकता थेट वरचेवर डांबर ओतून काम पूर्ण केल्याचे दाखवण्यात आले आहे. काम सुरू असताना आवश्यक मुरूम न टाकल्याने आणि केवळ वरचेवर डांबर ओतल्याने काही दिवसांत हा रस्ता उखडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी डांबराचा थर हातानेही उचलता येत असल्याचा व्हिडिओ ग्रामस्थांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.
सदर काम निकृष्ट दर्जाचे असून सरकारी निधीची उघड उघड नासाडी झाल्याचा आरोपही ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. “हे काम पूर्णपणे बोगस झाले आहे. पावसाळ्यात हा रस्ता एक दिवसही टिकणार नाही,” असेही ग्रामस्थांनी सांगितले.
निळेगावकडे जाणारा रस्ताही वरचेवर डांबर टाकूनच पूर्ण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे एक महिन्याच्या आत हा रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. “आमच्या गावाचा रस्ता व्यवस्थित करा,” अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
फत्तेपूर आणि निळेगाव रस्त्याच्या झालेल्या निकृष्ट कामाबाबत संबंधित विभाग कोणती दखल घेतो आणि काय कारवाई करतो, याकडे दोन्ही गावांतील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
