लोणार सरोवरात पाण्याची पातळी धोक्याने वाढली; १५ फूट पाण्याखाली गेले कमळजा देवीचे मंदिर...
Dec 16, 2025, 18:31 IST
लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे खाऱ्या पाण्याचे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सरोवर असून, सुमारे ५२ हजार वर्षांपूर्वी झालेल्या उल्कापातामुळे त्याची निर्मिती झाली आहे. बेसॉल्ट खडकातील हे जगातील एकमेव मोठे आघाती सरोवर (विवर) असून, येथील पाणी अल्कधर्मी स्वरूपाचे आहे. लोणार सरोवराच्या जतन व संवर्धनासाठी या विवरास वन्यजीव अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.
लोणार परिसरात सुमारे बाराशे वर्षांपूर्वीची प्राचीन मंदिरे असून, त्यापैकी १५ मंदिरे थेट सरोवराच्या विवरात आहेत, तर काही मंदिरे आजूबाजूच्या परिसरात विखुरलेली आहेत. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून लोणारच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवरातील पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून येत असून, ही गंभीर चिंतेची बाब ठरत आहे.
अलीकडे या सरोवरात मासे आढळल्यानेही मोठी चर्चा झाली होती. चारही बाजूंनी हेमाडपंथी मंदिरे असलेल्या या सरोवरातील कमळजा देवीचे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे. हे मंदिर आजपर्यंत कधीही पाण्याखाली गेले नव्हते; मात्र यावेळी ते तब्बल १५ फूट पाण्याखाली गेले आहे. त्यामुळे लोणारचे खारे पाण्याचे सरोवर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.
सरोवरातील पाण्याची पातळी नेमकी का वाढत आहे, याचा अद्याप ठोस शोध लागलेला नाही. देश-विदेशातील शास्त्रज्ञ व पर्यटक अभ्यासासाठी येथे येत असतात; मात्र खाऱ्या पाण्यात मासे कसे आढळतात आणि पाण्याची वाढ कुठून व कशामुळे होत आहे, हे अद्याप अस्पष्टच आहे. या सर्व बाबींवर सखोल व शास्त्रीय संशोधन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
