समृद्धीचे अंडरपास शेतकऱ्यांसाठी ठरताहेत डाेकेदुखी, सततच्या पावसाने चिखलातून काढावी लागते वाट; डाेणगाव परिसरातील चित्र, उपाय याेजना करण्याची शेतकऱ्यांकडून हाेतेय मागणी!

 
डोणगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : समृद्धी महामार्गामुळे माेठे अंतर काही तासात वाहन चालकांना गाठता येत आहे. मात्र,याच समृद्धी महामार्गांच्या अंडरपासचे पाणी काढले नसल्याने चिखल झाला आहे. शेतकऱ्यांसाठी समृद्धी महामार्गाखालून बनविण्यात आलेल्या अंडरपासची वाट पावसाने बिकट झाली आहे. या रस्त्यांवर चिखल साचल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे कठीण झाले आहे. समृद्धी महामार्गाच्या दोन ते तीन किलोमीटर अंतरावर बनविलेले हे अंडरपास डोकेदुखी ठरले आहेत. त्यावर शासनाने तातडीने उपाय याेजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

वाढदिवस जाहिरातसमृद्धी महामार्गाखालून शेतकऱ्यांसाठी अंडरपास तयार करण्यात आले आहेत. डाेणगाव जवळील अंजनी बु. शिवारात असलेल्या अंडरपासमध्ये माेठ्या प्रमाणात चिखल तयार झाला आहे. या चिखलातून शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे.  शेतकऱ्यांना आपल्या शेतांमध्ये जाण्यासाठी पूर्वी पांदण रस्ते होते. मात्र समृद्धी महामार्गाच्या निर्मितीमुळे रस्ते बंद झाले. या भागातून पलिकडच्या दिशेने जाताना शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी अंडरपास रस्ते बनविण्यात आले. सर्व्हिस रस्ते तयार करण्यात आले.

महामार्गाचे काम सुरू झाले तेव्हा वहिवाट रस्ते नामशेष झाले, तर दुसरीकडे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेले नैसर्गिक मार्ग बंद झाले. यामुळे समृद्धी
महामार्गावर पडणारे पावसाचे पाणी शेतांमध्ये शिरत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचले आहे. शेतीमधील गाळ पाण्यासोबत वाहून अंडरपास रस्त्यावर गुडघाभर चिखल साचला आहे. या बोगद्याखाली दिवसा अंधार पसरलेला असतो.
सध्या चिखलामुळे ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, ट्रॅक्टरवरील फवारणी यंत्र नेता येत नाही. चिखल, पाण्यातून कशीबशी वाट काढावी लागत आहे. त्यामुळे, डाेणगाव जिल्ह्यातून ज्या ज्या गावातून समद्धी महामार्ग गेला आहे तेथील शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यावर तातडने उपाय याेजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.