इच्छुक उमेदवारांच वाढलं टेन्शन! ऑक्टोबर– नोव्हेंबर नव्हे नव्या वर्षातच होऊ शकते स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन...
Aug 6, 2025, 11:10 IST
बुलडाणा(अक्षय थिगळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): २०२१–२०२२ पासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. ६ मे २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर ४ महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील अशी आशा निर्माण झाली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर जवळपास तीन महिने होत आले तरी फारशा वेगवान हालचाली त्यादृष्टीने झाल्या नाहीत.ऑक्टोबर – नोव्हेंबर मध्ये निवडणूका होतील अशी चर्चा सुरू असतानाच दस्तरखुद राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांनीच केलेल्या विधानानंतर आता या निवडणुका होण्यासाठी नवे वर्षच उजाडू शकते अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या इच्छुकांचे टेन्शन पुन्हा एकदा वाढले आहे.. आपण तयार केलेली हवा तोपर्यंत टिकेल का? हवेचा फुगा फुटला तर...? अशा टेन्शन आणणाऱ्या प्रश्नांनी इच्छुकांच्या डोक्याच्या नसा फुगल्या आहेत...
राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख दिनेश वाघमारे काल नाशिक दौऱ्यावर होते. तिथे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डिसेंबर आणि जानेवारी मध्ये निवडणुका होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी विधान केले. प्रलंबित असलेल्या महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असल्याचेही ते म्हणाले,मात्र यातील कोणता टप्पा आधी? यावरचे भाष्य त्यांनी केले नाही.राज्य निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या या विधानानंतर अनेक इच्छुकांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे. यातील बहुतांश इच्छुक हे ४ ते ५ वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत..कार्यकर्त्यांना सांभाळताना त्यांना नाकी–नऊ येत आहेत.निवडणूक अजून लांबणीवर जाण्याची चिन्हे असल्याने या इच्छुकांचे डोके तापले आहे...