पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा! बुलढाणा जिल्ह्यात चौघांचा बुडून मृत्यू; निमगाव व दसरखेड गावांवर शोकककळा..!
Sep 29, 2025, 12:24 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यातील नांदुरा आणि मलकापूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये चार जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे निमगाव व दसरखेड परिसरावर शोककळा पसरली आहे. नांदुरा तालुक्यातील निमगाव येथे ज्ञानगंगा नदीत पोहण्यासाठी उतरलेल्या करण गजेंद्र भोंबळे (१८) आणि वैभव ज्ञानेश्वर फुके (२५) या युवकांचा पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस ठाणेदार जयवंत सातव, सरपंच विकास इंगळे, तलाठी, पोलिस पाटील तसेच स्थानिक बचाव पथक दाखल झाले असून, सतत शोधमोहीम सुरू आहे.
दरम्यान, मलकापूर तालुक्यातील दसरखेड येथील नळगंगा-व्याघ्र नदीच्या संगमावर पाच अल्पवयीन मुले पोहण्यासाठी गेली. त्यातील शुभम राजेश दवंगे (१६) आणि सोहम उर्फ कांच्या वासुदेव सोनवणे (१५) हे नदीत बुडाले. यामध्ये शुभमचा मृतदेह सापडला असून, सोहमचा शोध वृत्त लिहीपर्यंत सुरू होता. या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
वानखेड येथे तिघांना वाचवले
वानखेड येथे नवरात्रोत्सवासाठी आलेल्या भाविकांपैकी तीन जण नदीत बुडत असताना जीवन इंगळे आणि विठ्ठल कुरवाळे या युवकांनी धाडस करून त्यांचे प्राण वाचवले. त्यांच्या तत्परतेमुळे गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीपात्रात पोहण्यासाठी जाण्याचे टाळावे, असे आवाहन केले आहे.