मासरूळ येथील धरणात सरपंचपुत्र बुडाले! पाणीपुरवठ्याची पाइपलाइन जोडण्यासाठी तिघे पोहत गेले धरणात; मधुकर महाले बेपत्ता! दुपारपासून शोधमोहीम सुरू; प्रशासनाची धाव...

 
बुलढाणा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : बुलढाणा तालुक्यातील मासरूळ येथील धरणात पाणीपुरवठ्याची पाइपलाइन जोडण्यासाठी गेलेले सरपंचपुत्र मधुकर गणपत महाले हे पाण्यात बुडाल्याची घटना आज, १९ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणातील पाइपलाइन जोडण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. मधुकर महाले यांच्यासह तिघेजण पोहत पोहत धरणात गेले होते. मात्र, याचदरम्यान मधुकर महाले हे पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून दुपारपासून त्यांचा शोध सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, मासरूळ येथील धरणातून पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेली पाइपलाइन जोडण्यासाठी मधुकर गणपत महाले यांच्यासह तिघेजण धरणाच्या पाण्यात उतरले होते. तिघेही पोहत पाइपलाइनजवळ पोहोचण्याचा प्रयत्न करीत असताना मधुकर महाले पाण्यात बुडाले. या घटनेनंतर तातडीने प्रशासनाला माहिती देण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे शोध व बचाव पथक धरणात त्यांचा शोध घेत आहे. तहसीलदारांसह महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित असून शोधकार्यावर लक्ष ठेवून आहेत. दुपारपासून सुरू असलेल्या शोधमोहिमेत अद्याप मधुकर महाले यांचा शोध लागलेला नाही. या घटनेमुळे मासरूळ परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.