स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था! अंत्यसंस्कारासाठी ट्रॅक्टरने न्यावा लागला मृतदेह; अंढेरा ग्रामपंचायतींचा कारभारावर ग्रामस्थांचा संताप..!

 
अंढेरा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह ट्रॅक्टरने न्यावा लागला. ही घटना देउळगाव राजा तालुक्यातील अंढेरा गावात घडली.ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची ही दुरवस्था झाली आहे. त्यामुळे, ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभारावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. 

अंढेरा गावातील रामदास तोताराम जोहरे (वय ७०) यांचे २६ जुलै रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर २७ जुलै रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यांची झालेली चाळण, रस्त्यांवर साचलेला चिखल, नाल्यांची दुर्दशा आणि परिसरातील अस्वच्छतेमुळे नातेवाईकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. शेवटी मृतदेह ट्रॅक्टरने स्मशानभूमीत नेण्यात आला. या प्रकरणामुळे अंढेरा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. शाळा, दवाखाना, आठवडी बाजार असलेल्या या गावात पावसाळ्यात रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट होते. नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांना रोजच्या रोज त्रास सहन करावा लागतो. नाल्यांची नियमित सफाई न झाल्याने रस्ते चिखलाने भरून जातात. स्मशानभूमीच्या दारापर्यंतही चिखलामुळे जायला मार्ग नसल्याने मृताच्या सन्मानातही अडथळा येतो.याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देउन उपाय याेजना करण्याची मागणी हाेत आहे.