“मंत्रालय तुमच्या बापाचं नाही, आमच्या शेतकऱ्यांच्या पैशावर चालतं!” रविकांत तुपकरांनी भरसभेत सांगितला मंत्रालयातील किस्सा; “राज्यातल्या नंबर दोनच्या मंत्र्याने मला फोन करून माफी मागितली!”
या प्रसंगाची माहिती देताना तुपकर म्हणाले, “मागच्या महिन्यात मी मंत्रालयात गेलो होतो. मंत्रालयाच्या पायऱ्या उतरत असताना एका मंत्र्याच्या दालनाजवळ माझी एका व्यक्तीशी भेट झाली. त्या व्यक्तीचं मंत्र्याकडे काम होतं. त्यांनी मला दोन मिनिटं मंत्र्यांशी बोलण्याची विनंती केली. मी त्यांच्यासोबत जायला निघालो, तर पोलिसांनी अडवलं. आत महत्त्वाची बैठक सुरू असल्याचं सांगितलं. त्यावर मी संतापलो. हे मंत्रालय आमच्या पैशावर उभं आहे आणि मंत्रीसुद्धा जनतेच्या पैशावरच आहेत. मग सामान्य माणसाला अडवता कशासाठी? मी तिथे जाब विचारल्यावर पोलीस जमा झाले, मंत्र्यांचे पीए, ओएसडी धावत आले. त्यांनी मला आत बसण्याची विनंती केली. पण मी स्पष्ट नकार दिला. दोन पायऱ्या उतरलो नसेल तोच संबंधित कॅबिनेट मंत्र्याचा फोन आला. ‘रविकांत भाऊ, मी माफी मागतो. तुम्ही कुठे आहात? मी तुमच्या मागे येतो,’ असं त्यांनी सांगितलं. मात्र, मी त्यांनाही स्पष्ट सुनावलं. तुमची जी मजा सुरू आहे ना, ती आमच्या शेतकऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे, हे लक्षात ठेवा!” संबंधित मंत्र्याने पोलिसांना आपली ओळख नसल्याचे सांगितल्यावर, “प्रश्न माझ्या ओळखीचा नाही. सामान्य माणूस जरी मंत्रालयात गेला तरी त्याला सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे,” असे आपण सुनावल्याचे तुपकर म्हणाले.
सरकारच्या खर्चाच्या प्राधान्यक्रमावरही तुपकरांनी प्रश्न उपस्थित केले. “आमदारांचे पगार वेळेवर होतात, अधिकाऱ्यांचे पगार वेळेवर होतात, मंत्र्यांना फिरण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या गाड्या घेतल्या जातात. इतर गोष्टींसाठी हजारो कोटी रुपये उपलब्ध होतात. मग शेतकरी आणि शेतमजुरांनाच मदत करायला पैसे का नसतात? आमचं एवढंच म्हणणं आहे की, सरकारजवळ एक तीळ असेल तर सात जण वाटून खाऊ. पण तुम्ही पाच जणांना सगळं देता आणि आम्हाला उपाशी ठेवता, हे कसं चालेल? संकटात सापडलेल्या माणसाला मदत करणं हे सरकारचं काम आहे. त्यासाठी अमेरिकेचं सरकार येणार आहे का?” असा सवाल त्यांनी केला. शेतकरी आणि शेतमजुरांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे सांगत तुपकरांनी ४ डिसेंबर रोजी बुलढाण्यात होणाऱ्या एल्गार महामोर्चाचा उल्लेख केला. दुष्काळ प्रश्नावर होणाऱ्या या एल्गार मोर्चात आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे तुपकर म्हणाले.