दिवाळीचा दिवा स्वतःच्या घरात नव्हे, तर संकटात सापडलेल्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात पेटवला! ॲड. शर्वरी तुपकरांनी सहकाऱ्यांसह गाठली माळेगावची आदिवासी वस्ती;

वनविभागाच्या कारवाईने व्यथित कुटुंबांसोबत साजरी केली दिवाळी! किराणा, फराळ, मिठाई कपडे, पणत्या आणि भेटवस्तू वाटून फुलवला आनंद; 'काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत' म्हणत दिला मायेचा आधार!

 
मोताळा (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : दिवाळी म्हटली की घराघरांत दिव्यांची आरास, गोडधोड पदार्थांचा सुगंध, नवीन कपड्यांची लगबग अन् आनंदाचा उत्सव... पण याच दिवाळीत अशीही काही घरे आहेत, जिथे परिस्थितीच्या अंधाराने आनंदाचा प्रकाशच हिरावून घेतला आहे. यंदाच्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना हातावर पोट असलेल्या भूमिहीन आदिवासी बांधवांची अवस्था तर आणखी बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या घरापुरती दिवाळी मर्यादित न ठेवता संकटात सापडलेल्या आदिवासी कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाचे चार क्षण निर्माण करण्यासाठी ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांनी पुढाकार घेतला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोताळा तालुक्यातील माळेगाव येथील आदिवासी वस्तीत पोहोचून त्यांनी कुटुंबीय, स्नेही आणि मित्रपरिवारासह दिवाळी साजरी केली. किराणा साहित्य, फराळ, मिठाई, नवीन कपडे,  पणत्या आणि लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटप करत या कुटुंबांना मायेचा आधार दिला. त्यामुळे एरवी संघर्ष आणि अडचणींच्या सावटाखाली जगणाऱ्या या आदिवासी वस्तीत दिवाळीच्या निमित्ताने आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले.

यंदा दुष्काळाची दाहकता प्रचंड आहे. शेतात जेवढे पेरले तेवढे उगवलेही नाही, अशी अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शेतकरीच आर्थिक संकटात सापडला असताना स्वतःची शेती नसलेल्या, रोजच्या कष्टावर संसाराचा गाडा ओढणाऱ्या आदिवासी बांधवांच्या व्यथा किती गंभीर असतील, याची कल्पनाही करवत नाही. त्यातच माळेगाव परिसरातील काही आदिवासी कुटुंबांना वनविभागाच्या कारवाईमुळे जमिनीच्या प्रश्नावरून संघर्ष करावा लागत असल्याचे सांगण्यात येते. पोटापाण्याचा प्रश्न, भविष्याची चिंता आणि प्रशासकीय कारवाईचे सावट अशा अनेक अडचणींचा सामना ही कुटुंबे करत आहेत. ह्या वस्तीत आजही वीज नाही की पिण्याच्या पाण्याची सोय नाही. 

अशा परिस्थितीत या बांधवांची दिवाळी अंधारात जाऊ नये, त्यांच्या चेहऱ्यावर किमान काही क्षण तरी हास्य फुलावे, या भावनेतून ॲड. शर्वरी तुपकर यांनी माळेगावच्या आदिवासी वस्तीत जाण्याचा निर्णय घेतला.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्या आपल्या कुटुंबातील सदस्य, स्नेही आणि मित्रपरिवारासह माळेगावात दाखल झाल्या. सोबत होते किराणा साहित्य, फराळ, कपडे, मिठाई, आणि लागवडीसाठी भारतीय प्रजातींची वृक्षरोपे! आदिवासी बांधवांच्या घरी जाऊन त्यांनी संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. किराणा आणि मिठाईचे वाटप करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

'काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत!'

या भेटीत केवळ साहित्य वाटपापुरता कार्यक्रम मर्यादित राहिला नाही. वनविभागाच्या कारवाईमुळे अडचणीत सापडलेल्या आदिवासी कुटुंबांशी ॲड. शर्वरी तुपकर यांनी संवाद साधला. त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. जमिनीच्या प्रश्नावरून निर्माण झालेल्या परिस्थितीत खचून जाऊ नका, असा धीर देत 'काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत!' अशा शब्दांत त्यांनी या बांधवांना आधार दिला.कधी कधी मदतीपेक्षाही 'आपल्या पाठीशी कुणीतरी आहे' ही भावना माणसाला जगण्याचे बळ देते. माळेगावच्या आदिवासी बांधवांसाठी ही भेट त्याच भावनेचा प्रत्यय देणारी ठरली.

माणुसकीसोबत निसर्गसंवर्धनाचाही संदेश!

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाळी साजरी करताना पर्यावरण संवर्धनाचाही संदेश देण्यात आला. ॲड. शर्वरी तुपकर यांच्या पुढाकारातून भारतीय प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची शपथ घेतली. जल, जंगल आणि जमिनीशी, निसर्गाशी अतूट नाते असलेल्या आदिवासी बांधवांना जांभूळ, आंबा, चिंच, चिकू, पेरू, सीताफळ ह्यासह निरनिराळ्या वनवृक्षांची रोपे देखील देण्यात आली. दिवाळी म्हणजे केवळ दिवे लावणे, फटाके फोडणे किंवा गोडधोड खाणे नव्हे; तर दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवून त्याच्या आयुष्यात आनंदाचा एक छोटासा क्षण निर्माण करणेही दिवाळीच असते. माळेगावच्या आदिवासी वस्तीतल्या चिमुकल्या डोळ्यात देखील दिवाळीच्या दिव्यांचा आनंद चमकावण्यासाठी ॲड. शर्वरी तुपकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राबविलेल्या या उपक्रमातून हाच संदेश देण्याचा प्रयत्न झाला. ह्यावेळी तरुणाई फाउंडेशनच्या ज्योतीताई धंदर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शाहीनाताई पठाण, श्रीमती प्रज्ञाताई लांजेवार, सौ. राधिका तुपकर, श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, किन्होळा चे मुख्याध्यापक श्री गजेंद्र राजपूत सर, श्री गजानन राऊत सर, बुलडाणा येथील विधिज्ञ ऍड प्रवीण सुरडकर, सामाजिक कार्यकर्ते आशिष खरात., कार्तिक खेडेकर,रामकृष्ण मोरे ,कडुबा मोरे, राजू मोरे यांचेसह अनेक संवेदनशील नागरिक उपस्थित होते.