गरीब परिस्थितीतून यशस्वी व्यावसायिकतेकडे प्रवास; मुकेश बाबुराव काळे यांना मिळाले दोन प्रतिष्ठित पुरस्कार!
टायकाेन ग्रुपचा भारत उद्याेग गाैरव तर अनाथ सेवक संस्थेने महाराष्ट्ररत्न पुरस्काराने केले सन्मानीत..!
Aug 12, 2025, 18:22 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नामवंत कीर्तनकार ह. भ. प. बाबुरावजी महाराज काळे यांचे चिरंजीव मुकेश बाबुराव काळे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीत अनेक संकटांचा सामना करत आई-वडिलांच्या मान-सन्मानाचा विचार मनात ठेवला. कुठल्याही व्यसनाच्या आहारी न जाता योग्य विचारसरणी स्वीकारत त्यांनी कारकीर्द घडवली. त्यांनी जाॅब प्लेसमेंट सेवा सुरू करून अनेक बेराेजगारांना राेजगार उपलब्ध करून दिला.त्यांच्या कार्याची दखल घेत सामाजिक संघटनांनी त्यांना पुरस्कार देवून सन्मानीत केले आहे.
मुकेश काळे यांनी सुरूवातीच्या काळात काही वर्ष बालाजी अर्बन शाखा, दुसरबीड येथे रोखपाल म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी SBI Card मध्ये ६ वर्षे सेवा बजावली. स्वतःचा व्यवसाय उभारण्याची जिद्द मनात ठेवून, त्यांनी छत्रपती संभाजीनगरसारख्या मोठ्या शहरातील नामांकित प्रोझोन मॉल परिसरात भाडेतत्त्वावर एक छोटेसे कार्यालय सुरू केले. १५ ऑगस्ट २०२४ रोजी वडील ह. भ. प. बाबुरावजी महाराज काळे व आई गोदावरी बाबुराव काळे यांच्या हस्ते कार्यालयाचे पूजन करून जॉब प्लेसमेंट सेवेला प्रारंभ केला. या माध्यमातून अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
या सामाजिक कार्याची दखल घेत, टायकोन ग्रुपने २२ एप्रिल २०२५ रोजी कोल्हापूर येथे अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या हस्ते भारत उद्योग गौरव पुरस्कार प्रदान केला. या सन्मानानंतर त्यांनी अधिक जोमाने कार्य सुरू केले. तळागाळातील, आधारविहीन अनाथ बेरोजगार युवक-युवतींना देखील त्यांनी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या.
या कार्याची नोंद घेत अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था, महाराष्ट्र राज्य यांनी त्यांना २०२५ चा वीर शिवछत्रपती महाराष्ट्ररत्न पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार अहिल्यानगरचे नगरसेवक मा. डॉ. सागर बोरुडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मुकेश बाबुराव काळे यांचा गरीबीतून यशस्वी व्यावसायिकतेपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असून, त्यांच्या पुढील कार्याबद्दल समाजात अपेक्षा व्यक्त होत आहेत.