हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटकडे जिल्ह्यातील वाहन धारकांची पाठ; १५ ऑगस्टपर्यंतच मुदत; दाेन दिवसात २ लाख ४५ हजार वाहनांना नंबर प्लेट कशी बसवणार!
Aug 13, 2025, 16:42 IST
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : वाहनांच्या चाेऱ्या राेखण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल २०१९ पूर्वी नाेंदणी केलेल्या सर्व जुन्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) लावण्याचा निर्णय घेतला आहे. बुलढाणा जिल्ह्यात एप्रिल २०१९ पूर्वीची दाेन लाख ९० हजार २९१ वाहने आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ ४४ हजार ७८१ वाहन धारकांनीची एचएसआरपी बसवली आहे. ही नंबर प्लेट बसविण्याची मुदत १५ ऑगस्ट असून दाेन दिवसात दाेन लाख ४५ हजार ५१० वाहनांना ही नंबर प्लेट कशी बसवणार असा प्रश्न आहे. राज्यभरातच ही स्थिती असल्याने शासनाकडे पुन्हा मुदतवाढ देण्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र आहे.
देशभरात वाहन चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच बनावट नंबर प्लेट लावून अनेक वाहने फिरत आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी केंद्र शासनाने एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हानिहाय एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे.बुलढाणा आरटीओ कार्यालयांतर्गंत ९ तर खामगाव आरटीओ कार्यालयांतर्गंत ८ अधिकृत केंद्रावर ही नंबर प्लेट बसविण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, जिल्ह्यातील वाहन धारकांनी याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ ही वाहनचोरी व बनावट नंबरप्लेट रोखण्यासाठी प्रभावी उपाय असून, त्यावर लेझर कोडेड अद्वितीय क्रमांक दिलेला असतो. एप्रिल २०१९ पूर्वी नाेंदणी झालेल्या जिल्ह्यातील वाहन धारकांनी एचएसआरपी बसवून घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ज्ञानेश्वर हिरडे यांनी केले आहे.