आमदार गायकवाडांच्या कार्यालयाकडे निघालेला काँग्रेसचा सत्याग्रह जयस्तंभ चौकातच थांबला; आमदारांनी भरचौकात स्वीकारले निवेदन..! वाचा नेमकं काय घडलं?

 
बुलढाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या मागणीसाठी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर बैठा सत्याग्रह करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आमदारांच्या कार्यालयाकडे निघाले असतानाच जयस्तंभ चौकात पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर काही वेळातच आमदार संजय गायकवाड स्वतः जयस्तंभ चौकात पोहोचले आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून दुष्काळाच्या मागणीचे निवेदन स्वीकारले.

काँग्रेस भवनातून आमदारांच्या कार्यालयाकडे निघालेला मोर्चा जयस्तंभ चौकात पोहोचताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. त्यामुळे काही काळ चौकातच वातावरण निर्माण झाले. दरम्यान, आमदार संजय गायकवाड तेथे उपस्थित झाल्याने काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे आपले निवेदन सादर केले.

यावेळी आमदार गायकवाड यांनी राज्य सरकारकडून बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीबाबत सकारात्मक विचार सुरू असल्याचे सांगितले. बुलढाणा जिल्ह्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश होईल, असे आश्वासनही त्यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, केवळ आश्वासनावर समाधान मानणार नसल्याची भूमिका काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केली. बुलढाणा जिल्ह्याचा प्रत्यक्षात दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शासनाने ठोस निर्णय घेतला नाही, तर आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिला. त्यामुळे आमदारांच्या कार्यालयासमोर होणारा नियोजित सत्याग्रह जयस्तंभ चौकातच निवेदन स्वीकारल्यानंतर थांबला असला, तरी दुष्काळाच्या मुद्द्यावरून काँग्रेसची पुढील भूमिका काय राहणार, याकडे आता लक्ष लागले आहे.