तक्रारीला केराची टोपली; महिला ग्रामपंचायत सदस्यांचे पंचायत समितीसमोर उपोषण; निकृष्ट कामे, निधी गैरवापराचा आरोप; जिल्हास्तरीय चौकशीची मागणी...
याशिवाय, चिखली येथील संबंधित ठेकेदाराने देऊळगाव कुंडपाळ येथे मागील पाच वर्षांत केलेली सर्व कामे निकृष्ट दर्जाची असून, त्यामध्ये शासनाच्या निधीत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराच्या सर्व कामांची जिल्हास्तरावरून सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणतेही बिल अदा करू नये, अशी ठाम मागणी करण्यात आली होती.
या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल न घेतल्याने अखेर ग्रामस्थांसमवेत उपोषणास बसण्याचा निर्णय सौ. राठोड यांनी घेतला आहे.
दरम्यान, आपण महिला असूनही तक्रारीची चौकशी न करता संबंधित ठेकेदाराला प्रशासनाकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत, ठेकेदाराच्या नातेवाईकांकडून आपल्यासह कुटुंबीयांच्या जिवितास धोका असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. उपोषण काळात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
