अंढेरा पोलीस स्टेशनच्या बीट जमादारांना वेसण घालण्याची गरज! दोन बीट जमादारांच्या कारनाम्याची सगळीकडे चर्चा..

 
मेरा खुर्द (ऋषी भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सद्रक्षणाय खलनिग्रहाय हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद.. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचे उच्चाटन करण्याचे काम पोलिसांकडून अपेक्षित असते..अर्थात महाराष्ट्र पोलीस त्याबाबतीत देशात टॉपला आहेतच..मात्र बोटावर मोजणाऱ्या मोजक्या कर्मचाऱ्यांकडून मात्र हा ब्रीद वाक्याला हरताळ फासल्या जातोय, अशा कामचलाऊ कामधकाऊ पोलीस कर्मचाऱ्यांमुळे कधीकधी चांगल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांकडे सामान्य जनतेचा पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून जातो... हो, थेट मुद्द्याचं सांगतो... बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशन सध्या ठाणेदार  रुपेश शक्करगे यांच्या  दमदार अन् कामदार कामगिरीमुळे एसपी निलेश तांबेच्या गुड –बुक मध्ये आहे. मात्र ही गुड –बुक मधील नोंद कायम ठेवायची असेल तर शक्करगे यांना त्यांच्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना थोडी वेसन घालण्याची गरज आहे. आता थेट मुद्द्याचं बोलू,अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत एक –दोन बीट जमादारच्या वागणुकीमुळे पोलिस यंत्रणेकडे पाहण्याचा सामान्यांचा दृष्टिकोन बदलू लागला आहे.. स्वतः पोलिस हेड कॉन्स्टेबल असलेले हे बीट जमादार अगदी ठाणेदाराच्या ऐटीत वावरतात खरे मात्र त्यांचे एकेक कारनामे ऐकून स्वतः ठाणेदारही कपाळावर हात मारून घेत असतील कदाचित..
अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीत देऊळगाव घुबे आणि मेरा खुर्द हे बीट चर्चेत आहेत. या बीटची जहागीरदारी आपल्याला मिळावी म्हणून अनेकदा पोलिस हेड कॉन्स्टेबल मध्ये स्पर्धा असते..आता ही स्पर्धा का असते? हे सुज्ञ नागरिकांना सांगण्याची गरज नाही.  बरं ते असो..असू द्या स्पर्धा.. पण मग बीट घेतल्यानंतर ते नीट सांभाळायचे ना..? पण या दोन्ही बीट मध्ये अवैध दारूचा प्रचंड सुळसुळाट वाढला आहे. अनेकांचा संसार उध्वस्त करणाऱ्या दारूचा बंदोबस्त करणे अपेक्षित असतांना बीट जामदार मात्र दारू विक्रेत्यांना छुपे पाठबळ देत असल्याची चर्चा सामान्य नागरिकांत आहे. ठाणेदारांची दिशाभूल या बीट जमादारांकडून होत असल्याचे नागरिक सांगतात. इतर छोट्या मोठ्या तडजोडी(?) देखील करण्यात हे बीट जमादार माहीर आहेत..त्यामुळे ठाणेदार साहेब या बीट जमादारांना जरा वेसण घालण्याची गरज आहे..