रामनगरात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून तणाव; पोलिसांचा कडक बंदोबस्त...

 
खामगाव (बुलढाणा लाइव्ह वृत्तसेवा) : खामगाव तालुक्यातील रामनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उभारणीवरून आज पहाटे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे.
माहितीनुसार, काही महिन्यांपासून सार्वजनिक जागेवर पुतळा बसविण्याच्या मुद्द्यावरून स्थानिक स्तरावर चर्चा सुरू होती. आज पहाटे या विषयावरून वाद निर्माण झाल्याची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस स्टेशनसह पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळी दाखल झाली.

कायदो व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी गावात कडक बंदोबस्त ठेवला आहे. संवेदनशील ठिकाणी पोलिसांची गस्त वाढविण्यात आली असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणतीही अफवा पसरवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींशी चर्चा करून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. प्रशासनाच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी संयम राखावा, असे आवाहन करण्यात आले आहे.