बुलढाण्यात पुन्हा तणाव!युवक काँग्रेस-गायकवाड समर्थक आमनेसामने, घोषणाबाजीने परिसर दणाणला....

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता बुलढाण्यात उफाळून आला असून, आज शहरात युवक काँग्रेस आणि आमदार गायकवाड समर्थक आमनेसामने आल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
माहितीनुसार, काल भारतीय कम्युनिस्ट पक्ष व इतर डाव्या संघटनांनी आमदार गायकवाड यांच्या विरोधात केलेले आंदोलन चिरडण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सार्वजनिक वाचन करण्यात आले.

यावेळी युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि आमदार गायकवाड समर्थक यांच्यात समोरासमोर परिस्थिती निर्माण झाली. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करत वातावरण तापवले. काही काळ तणाव शिगेला पोहोचला होता.

मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि संभाव्य संघर्ष टाळला. घटनेदरम्यान परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकारामुळे बुलढाण्यात राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.