रोखठोक! जिल्ह्याच्या राजकारणात वाढतोय नंबर दोन वाल्यांचा प्रभाव! गुटख्यावाले, राशन माफिया, रेतीवाले नगरसेवक झाले... सज्जनशक्तीच्या निष्क्रियतेचाच परिणाम..!
Jan 6, 2026, 14:37 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय हा मुद्दा आहेच तेवढा गंभीर..! राजकारण सज्जन लोकांचं राहिलंय कुठं? असा सवाल आता गावोगावी गल्लोगल्ली उपस्थित होतोय..अर्थात याला लोकंही तेवढेच जबाबदार..! नंबर दोन वाले सुरक्षेसाठी राजकीय आश्रयाला जातात.. "धंदा" करून पैसा कमावतात..कमाईचा काही हिस्सा राजकीय गॉडफादरला देतात..निवडणुका आल्यावर राजकीय गॉडफादर पैसेवाला उमेदवार शोधतात..आता कोट्यवधी रुपये "सज्जन" मार्गाने कसे येतील? मग दोन नंबरवालेच तिकीट घेतात..बक्कळ अगदी पाण्यासारखा पैसा खर्च करतात अन् शेवटी उधळतात गुलाल विजयाचा..आता हीच रीत झालीय.. खरंतर नंबर दोन वाल्यांचा गेम करण्याची संधी जनतेच्या हाती असते, मात्र गेम करण्याऐवजी बरोबर नेम साधल्या जातो...हल्लीच्या राजकारणाच हेच जळजळीत वास्तव आहे.. राज्याचं सोडा हो..आपला बुलडाणा जिल्हा कुठं कमी हाय..नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी नंबर दोनच्या धंद्यावाले निवडून आलेत...!
पूर्वी राजकारण जनसेवेच साधन होत..राजकारणाला साध्य मानण्याऐवजी राष्ट्रहिताचं साधन मानल्या जात होतं..मात्र आता काळ बदललाय..साधा नगरसेवक होण्यासाठी कोट्यावधी रुपये उधळले जातात..कशासाठी? जनहिताची प्रचंड तळमळ असते म्हणून? छे छे कसली जनसेवा अन् कशाच काय.. नावाला जनसेवा अन् हेतू "मेवा" खाण्याचा! अर्थात सगळ्याच राजकारण्यांना दोष देणे म्हणजे गव्हासोबत "किडे" रगडण्यासारखे होईल... पण प्रामाणिक राजकीय हेतू असणाऱ्यांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे एवढे मात्र खरेच.. तर असो...मुद्दा आहे नंबर दोन वाल्यांचा..! नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी नंबर दोनचा धंदा करणारे विजयी झालेत..
जिल्ह्यात ११ नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. काही ठिकाणी गुटख्या वाले, काही ठिकाणी दारूवाले, नंबर दोनच्या "जवारीवाले" म्हणजे राशन धान्याचा काळाबाजार करणारे..रेतीच्या टिप्परवाले विजयी झालेत..सगळ्याच राजकीय पक्षांनी उमेदवारी देण्यासाठी नंबर दोन वाल्यांना प्राधान्य दिले.. अर्थात निधी खर्च करण्याची क्षमता नंबर दोन वाल्यांकडे अधिक, त्यामुळे असे झाले असेल कदाचित! एकंदरीत राजकीय व्यवस्था ज्या पद्धतीने वाहवत जात आहे ती वाटचाल समाजव्यवस्थेच्या पतनाची आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल.. नंबर दोन वाल्यांची संख्या तशी कमीच.. पण अभाव आहे तो सज्जनशक्तीच्या निष्क्रियतेचा! आपल्याला काय त्याचे? ही मानसिकता सोडावी लागेल.. नंबर दोन वाल्यांचा गेम करायचा असेल तर सज्जनशक्तीला राजकीयदृष्ट्या संघटित व्हावेच लागेल..
