अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवले यश; राधा बेले आणि आरती बेले भगिणींची एमबीबीएससाठी निवड! परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात घेतला प्रवेश...
Updated: Aug 15, 2025, 11:48 IST
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कुठलीही काेचिंग न लावता, अतिशय डाेंगराळ भागात शैक्षणिक सुविधा उपलब्ध नसताना भाेसा येथील बेले भगिंनींनी कठाेर परिश्रम आणि मेहनतीच्या जाेरावर नीट परिक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून एमबीबीएसला प्रवेश मिळवला आहे. या दाेन्ही बहीणींचा परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे. आदीवासी कुटुंबातील या मुली आता डाॅक्टर हाेणार आहेत. त्यांच्या या यशासाठी भाेसा येथील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला.
राधा अशोक बेले ही आदिवासी समाजातील विद्यार्थिनी मेहकर येथील सेंट्रल पब्लिक स्कूलमधून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली, तर तिची बहीण आरती अशोक बेले हिने चिखली येथील सैनिक स्कूलमधून बारावी पूर्ण केली. वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक पात्रता परीक्षा दोघींनीही उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली असून, त्यांना परभणी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. या दोन्ही बहिणींचा शुक्रवारी विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी भोसा येथील ग्राम सचिव ठाकरे साहेब आणि माजी जिल्हा परिषद सदस्य कैलास चवरे उपस्थित होते.